पुढचा लढा निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी – अण्णा हजारे

August 28, 2011 5:39 AM0 commentsViews: 5

28 ऑगस्टजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपालाच्या तीन अटीला काल लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. यानंतर आज अण्णांनी नारळ पाणी आणि मध घेऊन उपोषण सोडले. दिल्लीत राहणार्‍या सिमरन आणि इक्रानं या दोन चिमुकलींच्या हाताने अण्णांनी आपलं उपोषण सोडलं. रामलीला मैदानासह संपूर्ण देशात एकच जल्लोष झाला. मात्र उपोषण संपलं असलं तरी आंदोलन मात्र संपलेलं नाही असं अण्णांनी स्पष्ट केलं. आता आपलं यापुढचं ध्येय निवडणूक प्रक्रियेसाठी सुधारणा करणं हे आहे असंही अण्णांनी स्पष्ट केले. लोकशक्तीने संसदेला निर्णय घ्यायला भाग पाडलं असंही अण्णा म्हणाले.

अण्णांनी उपोषण सोडल्यानंतर मीडियाचे आभार मानले. मेदांत हॉस्पिटल आणि त्यांच्या डॉक्टरांचे आभार मानले. त्याच सोबत अण्णांनी नागरी समितीच्या सदस्यांचे ही आभार मानले. अण्णांनी लोकांचे आभार मानताना म्हणाले की, ही देशाची युवा शक्ती आहे त्यांचे मी आभार मानतो. त्यावेळी त्यांच्या तब्येतीची काळजी लागून राहिलेल्या लाखो समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अण्णांच्या उपोषणाची सांगता झाल्यावर त्यांच्या गावात राळेगणमध्येही जल्लोष झाला. दरम्यान, 12 दिवसांच्या उपोषणानंतर अण्णांना अशक्तपणा आला. त्यावर उपचार करण्याकरता अण्णांना गुडगावच्या मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

close