अण्णांच्या लढ्याला जनआंदोलनाचं बळ !

August 28, 2011 8:39 AM0 commentsViews: 3

28 ऑगस्टरामलीला मैदानावर 12 दिवस चाललेल्या अण्णांच्या आंदोलनामागे सर्वात मोठी शक्ती होती ती जनमानसाची. अण्णांच्या आंदोलनाला लोकांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. या 12 दिवसात रामलीला मैदानावर जणू कुंभ मेळाच भरला होता.

16 ऑगस्टपासून अण्णांचं आंदोलन सुरू झालं. आणि देशभरात त्याचे पडसाद उमटायला लागले. अभूतपूर्व असा पाठिंबा या आंदोलनाला मिळायला लागला. कारण हे आंदोलन होतं सर्वसामान्यांचे प्रत्येक क्षणी भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागलेला. प्रत्येक नागरिक या आंदोलनात उतरला.आणि सुरू झालं एक क्रांती पर्व. मशाल मोर्चा, मेणबत्ती मोर्चापासून ते अगदी शेतकर्‍यांचा, कामकर्‍यांचा अशा अनेक मोर्चांनी देश दुमदुमून गेला.

रामलीला मैदानापासून राळेगणपर्यंत आणि आझाद मैदानापासून ओरिसापर्यंत प्रत्येक ठिकाणी रस्त्यारस्त्यावर आंदोलनं सुरू होती. या आंदोलनात कोण नव्हतं ? लहान मुलं…कॉलेजचे तरूण…गृहिणींपासून अगदी जख्ख म्हातार्‍यांपर्यंत सगळेजण उतरले अण्णांच्या समर्थनासाठी, भ्रष्टाचार संपवण्यासाठी, एरवी विठ्ठलाच्या भक्तीत दंग असणारे वारकरीही या आंदोलनात उतरले त्यांनी दिंडी काढली.

आणि भजनातून, टाळ मृदुंगाच्या गजरात लोकपालाविषयी जनजागृतीमध्ये केली. अगदी क्षुल्लक काम करण्यासाठीही चिरीमिरी द्यावी लागत असल्याने संतप्त झालेल्या समाजाच्या प्रत्येक वर्गाचं प्रतिनिधीत्व या आंदोलनात दिसलं. कोणी सायकलवरून दिल्लीपर्यंत लोकपालाचा संदेश घेऊन गेला तर कोणी पदयात्राही केली.

नाशिकमध्ये सेक्स वर्कर रस्त्यावर उतरल्या. शेतकरीही ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आंदोलनात सहभागी झाले. एरवी अनेकांचे प्राण वाचवणार्‍या ऍम्ब्युलन्सही आंदोलनात आल्या. डंपरमालकांपासून ते एरवी राजकारणापासून अलिप्त असणारे आयटी प्रोफेशनल्सनंही या आंदोलनात हजेरी लावली. अण्णांवर, त्यांच्या आंदोलनावर पोवाडेही रचले गेले. या आंदोलनाचं प्रतिबिंब उत्सवांमध्येही साहजिकच दिसले. अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडली गेली.

तर येणार्‍या गणेशोत्सवातही अण्णांचाच प्रभाव पहायला मिळतोय. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनं, अण्णा हजारे यांना पाठिंबा देणारे देखावे तर आहेतच. तर नागपूरमध्ये चक्क मी अण्णा हजारे लिहीलेली टोपी घातलेले गणपती बाप्पा तयार करण्यात आले आहेत. राळेगणमध्ये भ्रष्टाचाररूपी रावणच तयार करण्यात आला. सरकारचा निषेध म्हणून मुंडनही करण्यात आलं. सरकारविरोधातली ही धार इतकी तीव्र होती की जनावरांना केंद्रीय मंत्र्यांची नावं देऊन त्यांची रॅलीही काढण्यात आली.

हे तर झालं देशभरातल्या आंदोलनांविषयी. पण प्रत्यक्ष रामलीलावरच्या आंदोलनातही अनेक रंग दिसले. इथे हनुमानही होता. आणि बॉलीवूडच्या पोस्टर्सवरचे हिरो अण्णाही होते. पण सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र सारखी होती ती म्हणजे त्यांच्या डोक्यावरची मी अण्णा हजारे लिहीलेली गांधी टोपी.

फक्त फॅशन म्हणून नाही तर नविन विचारही रुजवलेल्या या गांधी टोपीनं आंदोलनाचं स्वरूपच बदललं. उत्स्फूर्तता, तरूणांचा प्रचंड सहभाग, महिलांची लक्षणीय संख्या आणि अहिंसक मार्गानं होणार्‍या या आंदोलनानं आंदोलनाचा एक अभिनव आविष्कार जगापुढे आणला. आणि सगळ्यांनाच पटवून दिलं. मशाले जलती रहेंगी…

close