मुंबई,पुण्यात पावसाचे धूमशान

August 29, 2011 10:03 AM0 commentsViews: 8

29 ऑगस्ट

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे शहराला झोडपून काढले आहे. आजही पुण्यामध्ये संततधार पाऊस सुरूच आहे. खडकवासल्यातून 40 हजार पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरातला भिडे पूलही पाण्याखाली गेला आहे. पुण्याहून मुंबईला जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. तसेच सिंहगड एक्सप्रेसही रद्द झाली.

पवना धरणाच्या पानलोट क्षेत्रात तशेच मावळ भागातील डोंगराळ भागात गेलेल्या 48 तासापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे. पवना धरणातून 12,500 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने पवना नदीवरचे बहुतांश पूल पाण्याखाली गेले आहेत.

खबरदारी म्हणून नदीकाठावरच्या सांगवी गांधीनगर झोपडपटट्ीतील 100 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. बेबळ ओव्हळ इथल्या पुलावरुन जात असताना जयवंत शिंदे नावाचा इसम वाहून गेला तर इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने वाडीवळे पूल पाण्याखाली गेला. जवळपास 9 गावांचा संपर्क तूटला आहे. मुंबईत लोकल स्लो ट्रकवरकाल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. आज वर्किंग डे असल्याने चाकरमाने कामासाठी घराबाहेर पडले. मात्र पावसामुळे आणि रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांमुळे बहुतेक रस्त्यावर ट्रॅफिक जाम होतं. पण यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना लोकलचाही दिलासा मिळाला नाही. कारण लोकल्सही काही काळ ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर धीम्या गतीने लोकल्स सुरू झाल्या. पण स्टेशन्सवर भरपूर गर्दी होती. एकूणच पाऊस आणि विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक यामुळे मुंबईकर आज अगदी जेरीला आले होते.

पावसाने रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे मुंबईतली लोकलसेवा काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे कामाची वेळ असल्याने रेल्वे स्टेशन्सवर भरपूर गर्दी होती.11 च्या सुमारास लोकल सुरू झाल्या. मात्र धीम्या गतीने सुरू असलेल्या या वाहतुकीने स्टेशन्सवर चांगलीच गर्दी होती. कामावर जाण्यासाठी मुंबईकरांचे यामुळे चांगलेच हाल झाले.

पश्चिम महाराष्ट्रात धरणे तुडूंब

पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 टक्के भरलं. धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 8 हजार आठशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

राजाराम बंधार्‍याची पाण्याची पातळी 30 फुटावर जाऊन पोहोचली. जिल्ह्यातील भोगवती, कुंभी, तुळशी नद्यांचं पाणीही पात्राबाहेर पडलंय. तर -सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मुसळधार पाउस सुरु आहे. कोयना धरणाचे सर्व दरवाजे 11 फूटाने उघडले असून धरणातून 95 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण क्षेत्रातील संततधार सुरु असल्याने विसर्ग वाढू शकतो. कराड, पाटन आणि सांगली शहराला पुराचा धोका असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोकणात पावसाचा जोर कायम

कोकणात सलग तिसर्‍या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. माथेरान इथं सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पाताळगंगा, गाढी आणि उल्हास या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अलिबागमधील बाजारपेठांमध्ये सकाळी पाणी शिरली होतं. त्यामुळे दुकानदारांचे नुकसान झाले. येत्या 24 तासात किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. कोकण रेल्वे मात्र सध्या सुरळीत सुरु आहे.

तर खेड-दापोली महामार्गावरची वाहतूक पाणी साचल्याने बंद झाली. जगबूडी नदीचे पाणी खेडच्या बाजारपेठेत शिरले. इथल्या मच्छी मार्केटमध्येही पाणी शिरले आहे. तर खेड तालुक्यातल्या निलिक गावात मुसळधार पावसामुळे डोंगर खचला. त्यामुळे दोन घरांची पडझड झाली. तर 25 घरांना धोका निर्माण झाला. या दुर्घटनेत 1 महिला जखमी झाली.

close