बाप्पाचं उत्साहात आगमन

September 1, 2011 8:56 AM0 commentsViews: 20

01 सप्टेंबर

महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणरायचं मोठ्या भक्तीभावाने राज्यभरात आगमन होत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली आहे. ढोल ताशाच्या निनादात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होत आहे. मागील चार – पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज थोडीशी विश्रांती घेतल्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. 'गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष करत गल्लोगल्ली बाप्पाचे आगमन होत आहे. तर मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची रीघ लागली. दर्शनाची रांग 4 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. तर मुखदर्शनाची रांग 2 ते अडीच किलोमीटरपर्यंत गेली. नवसाची रांगेत सर्वाधिक गर्दी आहे. ही रांग साडे चार किलोमीटरपर्यंत म्हणजे अभ्युदय नगरपर्यंत पोहोचली आहे. भाविकांना बारा बारा तास रांगेत उभं राहावे लागत असल्याने लालबागचा राजा मंडळाने म्हाडाचे एक मैदान भाड्याने घेऊन तिथं रांगेतील भाविकांच्या बसण्याची सोय केली. यात जवळपास 25 हजार गणेशभक्तांची बसण्याची सोय करण्यात आली.

पुण्यात मानाच्या गणपतींचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत

महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुण्यात आज गणरायाचं मोठ्या दिमखात आगमन झालं. पुण्यातील मानाच्या गणपतींची मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना झाली. मानाचा पहिला गणपती आणि पुण्याचं ग्रामदैवत असणार्‍या कसबा गणपतीची पारंपारिक पद्धतीने मिरवणुक काढण्यात आली. ढोल, लेझिम पथकाच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

तर मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी. पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना आज दुपारी 1 वाजता झाली. यावेळी गणपतीची मिरवणूक रथातून काढण्यात आली होती. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांच आगमन झालं. कार्यकर्त्यांच्या मोरया मोरयाच्या गजरात बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाचा चौथा गणपती म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुळशीबाग गणपतीची साग्रसंगीत पुजा करुन प्रतिष्ठापना करण्यात आली.

मानाच्या गणपतींमध्ये फक्त याच गणपतीची मिरवणूक काढली जात नाही. गणपती समोर जोरदार ढोल ताशाचा निनादात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यामध्ये खरंतर मोठ्या मुतीर्ंची परंपरा नाही. पण तुळशीबागने मात्र गेल्या अनेक वर्षांपासून एक मोठी मूर्ती बसवण्याची परंपरा कायम राखली आहे. सुंदर दागिन्यामध्ये सजलेली ही मूर्ती पाहुन प्रत्येकच भाविकाचं मन प्रसन्न होतं.

तसेच पुण्यातील मानाचा 5 वा गणपती म्हणजे केसरी वाड्याचा गणपती.आज सकाळी 11 वाजता या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. लोकमान्य टिळकांचे वारस रोहीत टिळक आणि त्यांच्या कुटुंबींयानी मोठ्या उत्साहाने विधीवत गणेशाची प्रतिष्ठापना केली. सकाळी पारंपरिक पद्दतीने पालखीतून गणेशाची मूर्ती टिळक वाड्यात आणण्यात आली. मानाच्या 5 गणपतींपैकी या गणपतीचं पुणेकरांना विशेष महत्व आहे. टिळकांनी गणेशत्सोवाला खर्‍या अर्थाने सुरवात केली होती.

close