गणेशनिधी : गरोदर महिलांसाठी ‘वचन’बध्द सेवा

September 1, 2011 2:28 PM0 commentsViews: 19

दीप्ती राऊत, नाशिक

01 सप्टेंबर

यंदा आयबीएन-लोकमतच्या गणेशनिधी उपक्रमाचं चौथं वर्ष आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांना मदतीचा हात आम्ही देतो. आतापर्यंत 30 संस्थांना तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी मदत केली आहे. याही वर्षी गणेशनिधीच्या माध्यमातून हीच आशा ठेवून सुरू करतोय हा उपक्रम..

खरं तर बाळाला जन्म देणं हा सृजनाचा सर्वात मोठा अविष्कार. पण आजही अपुर्‍या सोयीसुविधांमुळे अनेक स्त्रियांसाठी बाळंतपण ही जीवघेणी कसरत ठरते. यातली एक गैरसोय म्हणजे वाहतुकीचा प्रश्न. नाशिकच्या वचन संस्थेतर्फे नेमकं त्यावरच उपचार शोधण्यात आला. ते एका हेल्थ कॉलसेंटरच्या माध्यमातून.

प्रसंग पहिला – "नमस्कार… वचन हेल्दी लोकशक्ती केंद्रात आपलं स्वागत. कोण बोलतंय ? इमर्जन्सी पेशंट आहे. नाव काय ? वय काय ? थांबा आम्ही गाडीची व्यवस्था करतो."

वचनच्या या हेल्दी लोकशक्ती केंद्रातून 24 तास काम सुरू असतं.

प्रसंग दुसरा – रामदास सोनवणे आहेत का ? सातपाड्यात एक इमर्जन्सी केस आहे डिलिव्हरीची. गरोदर मातेला हॉस्पिटलला न्यायचंय. पेशंटचं नाव घ्या.

त्र्यंबक तालुक्यातील डोंगरदर्‍यातील गावं असोत वा पेठ तालुक्यातले दुर्गम पाडे. गरोदर माता, आशा वर्कर्स आणि खाजगी गाड्यांच्या ड्रायव्हर्सचं वचनं हे नेटवर्क उभंारलंय. म्हणूनच पहिलटकरीण असलेल्या सविताच्या ऐन वेळेला धावून आले जवळच्या गावात राहाणारे ड्रायव्हर भिकाभाऊ .

सविताची आई मीराबाई पुंगळे म्हणतात, पायावाटे आल्याने बाळाची मान दबून गुदमरत होतं. मॅडमनी कोशीस केली, गाडी बोलवली केंद्राची. आम्हाला त्र्यंबकला घेऊन गेले. सविता सारख्या शेकडो महिलांची बाळंतपणं या हेल्थ कॉलसेंटरनं खर्‍या अर्थानं सुरक्षित केली.

बाळंतपणं सुरक्षित व्हावीत म्हणून ती दवाखान्यात करण्याची सक्ती सरकारने केली. पण गरोदर बाई दवाखान्यापर्यंत पोहोचणार कशी याची कोणतीही व्यवस्था नाही की तरतूद नाही. शेवटी गहातापाया पडून, जास्तीचे पैसे मोजून गाडीची व्यवस्था करा किंवा गाडीची व्यवस्था झाली नाही तर शेवटी घरीच बाळंतपण करा याशिवाय लोकांपर्यंत पर्याय नव्हता. नेमकी हीच कमतरता वचनच्या या हेल्थ सेंटरनं भरून काढली.

वचनचे संचालक डॉ. धृव मांकड म्हणतात, 70 टक्के बाळंतपणं घरीच होतात. यात मुख्य अडचण असते ती ट्रान्सपोर्टची. आम्ही अडीचशे-तिनशे ड्रायव्हर्सपर्यंत पोहोचलो, त्यांचं प्रशिक्षण घेतलं. ड्रायव्हर भिक्का म्हणतात, इमर्जन्सी पेशंट असलं की मी गाडीतलं भाडं सोडून येतो. दोन जीव वाचवल्याचं समाधान मिळते.

'दवाखान्यात बाळंतपण, सुरक्षित बाळंतपण' ही घोषणा खरं तर सरकारची पण ती सिद्ध करून दाखवली वचन संस्थेनं. वचन हेल्दी लोकशक्ती केंद्राला तुम्ही आर्थिक स्वरुपात किंवा वस्तूच्या स्वरुपात मदत करु शकता. त्यासाठी संपर्क करा-

गणेशनिधी मदतीसाठी संपर्क

वचन हेल्दी लोकशक्ती केंदवसुंधरा बंगला,शिवाजी नगर, फेम सिनेमाजवळनाशिक-पुणे रस्तानाशिक.vachannsk@gmail.com

close