अण्णा राळेगणमध्ये दाखल ; 15 दिवसांची सक्तीची विश्रांती

September 1, 2011 4:34 PM0 commentsViews: 1

01 सप्टेंबर

भ्रष्टाचाराविरोधातील दुसरी लढाई जिंकून अण्णा हजारे अखेर काल रात्री उशीरा राळेगणमध्ये दाखल झाले. त्यामुळे राळेगणमध्ये आज दुहेरी उत्सव आहे.अण्णांनी आज दिवसभर विश्रांती घेतली. त्यांची प्रकृती चांगली आहे. पण, पुढचे 15 दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी अण्णांना दिला. त्यामुळे पुढचे 15 दिवस अण्णा सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहणार आहेत. उद्या मात्र त्यांनी राळेगणची ग्रामसभा बोलावली आहे.

दिल्लीत रामलीला मैदानावर 13 दिवसांचे उपोषण करून अण्णा जनलोकपाल विधेयकाची ऐतिहासिक लढाई जिंकली. संसदेत जनलोकपाल विधेयकाचा मसुदा तत्वत:हा मान्य करण्यात आला. हा विजय जनशक्तीचा आहे आणि ही लढाई अर्धी जिंकली आहे असे उद्गार काढत अण्णांनी आपले उपोषण सोडले. 13 दिवस उपोषण केल्यामुळे अण्णांमध्ये प्रचंड अशक्तपणा आला होता.

उपोषण सोडल्यानंतर अण्णांना थेट गुडगाव येथील मेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर अण्णा हजारे थेट आपल्या गावी राळेगणसिध्दीला निघाले. काल रात्री अण्णांचे रात्री उशिरा राळेगणसिध्दीत आगमन झालं. अण्णांच्या सुचनेप्रमाणे त्यांचं स्वागत अत्यंत साध्या पद्धतीनं करण्यात आलं.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अण्णांची तब्बेत आता ठणठणीत आहे. त्यामुळे उद्या होणार्‍या कार्यक्रमात त्यांना कुठलाही त्रास होणार नाही असा दावा डॉक्टरांनी केला. उद्या संध्याकाळी 5 वाजता अण्णांच्या उपस्थितीत राळेगणसिद्धीत असलेल्या हॉस्टेलच्या पटांगणात ग्रामसभा होणार आहे.

close