भावगीतांचा सूर हरपला

September 2, 2011 7:01 AM0 commentsViews: 3

02 सप्टेंबर

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचं आज पहाटे राहत्या घरी ह्रदयविकारने निधन झालं. ते 85 वर्षाचे होते. श्रीनिवास खळे यांच्यावर ठाण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. खळे काकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यावेळी संगीत आणि चित्रसृष्टीबरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तीही उपस्थित होत्या. त्यांच्या जाण्याने भावगीतं पोरकी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होती. यावेळी वैकुंठमध्ये खळे काकांना अग्निशमन दलाच्या वतीन सलामी देऊन श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

मनात रुंजी घालणारी गाणी देणार्‍या खळेकाकांनी जीवनप्रवासात 6 सिनेमांना संगीत दिलं. यंदा कर्तव्य आहे (1956), बोलकी बाहुली (1961), पळसाला पाने तीन , जिव्हाळा (1968), पोरकी ( 1970), सोबती ( 1971 ), लक्ष्मीपूजन ( 1952- अप्रदर्शित) या सिनेमांना खळे काकांनी आपल्या स्वरसाजानं सजवलं होतं. त्याचबरोबर पाणिग्रहण, विदूषक आणि देवाचे पाय या नाटकांनाही खळे काकांचं संगीत लाभलं होतं. श्रीनिवास खळे नावाचा तारा निखळला !

खळे काका, मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते म्हणजे ''शुक्रतारा मंदवारा…''ची सोनेरी त्रयी. या त्रयीतला श्रीनिवास खळे नावाचा तारा आज निखळला. आपल्या या दिग्गज मित्राला आदरांजली वाहण्यासाठी मंगेश पाडगावकर आणि अरुण दातेही तातडीनं ठाण्याला खळे काकांच्या घरी दाखल झाले. फार मोठा संगीतकार आणि तितकाच मोठा माणूस हे सांगताना दातेंचं मन भरून आलं. तर जगणं जस आनंदानं स्वीकारलं तसेच मरणही स्वीकारायला हवं हे चटका लावणारं सत्य सांगताना पाडगावकरही हेलावले होते.

श्रीनिवास खळे हे ख•या अर्थानं भावगीतांचा बादशहा होते. तसेच त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. एक नजर टाकूया, खळे काकांना मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीवर.

खळेकाकांना मिळालेले पुरस्कार

1993- लता मंगेशकर पुरस्कार

1999- स्वरयात्री समाज गौरव पुरस्कार

2003- सुधीर फडके आणि बालगंधर्व पुरस्कार

2006 -झी मराठीचा जीवनगौरव पुरस्कार

2007- संगीत रत्न पुरस्कार

2008- सह्याद्री वाहिनीचा स्वररत्न पुरस्कार

2008- कोल्हापूर प्रतिष्ठानचा दत्ता डावजेकर पुरस्कार,

2007- वर्ल्ड स्पेस संस्थेतर्फे 2007 साली विशेष गौरव, लंडन, ऑस्ट्रेलियात रेडीओवर मुलाखत

2009- पद्मभूषण पुरस्कार

खळेकाकांची भावगीतं जशी गाजली तसे त्यांचे अभंगही तितकेच गाजले.

close