युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

September 3, 2011 4:22 PM0 commentsViews: 6

03 सप्टेंबर

राज्यात सध्या युवक काँग्रेसच्या कार्यकारणीच्या निवडणुकीचं वारे वाहत आहे. अध्यक्ष पदासाठी खरी लढत होणार आहे ती वनमंत्री पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजीत कदम आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाचा सत्यजीत तांबे यांच्यात. सत्यजीत हे विलासराव देशमुख गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी आमदार अमित देशमुख यांनी त्यांची पूर्ण ताकद उभी केली. तर निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विश्वजीत कदम यांच्या पाठीमागे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या समर्थकांची फौज उभी केली आहे.

तर उपाध्यक्ष पदासाठीसुद्धा अनेक नेत्यांच्या नातेवाईकांमध्ये चुरस आहे. रोजगार हमी मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत, माजी खासदार नरेश पुगलीया यांचा मुलगा राहुल पुगलीया, माजी आमदार अझहर हुसैन यांच्या मुलगा जिशान हुसैन यांच्यासह अनेक राजकारण्यांच्या नातेवाईकांनी उमेदवारी अर्ज भरले आहे. यामुळे युवक काँग्रेसची निवडणूक ही काँग्रेस नेत्यांच्या नातेवाईकांचीच निवडणूक होणार असल्याची चर्चा आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 8 सरचिटणीस पदांसाठी निवडणूक होतेय. त्यासाठी 17 आणि 18 सप्टेंबरला मतदान होणार आहे. युवक काँग्रेसचे 55 हजार मतदार मतदान करतील. तर 20 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

close