दिल्लीत बॉम्बस्फोट : 11 ठार

September 7, 2011 7:29 AM0 commentsViews: 12

7 सप्टेंबर, दिल्ली

राजधानी दिल्ली बुधवारी सकाळी बॉम्बस्फोटानं हादरून गेली. दिल्ली हायकोर्टाच्या गेट नंबर 5 जवळ सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी बॉम्बस्फोट झाला. त्यात 11 जणांचा मृत्यू झाला तर 76 जण जखमी झाले आहेत. हायकोर्टच्या गेट नंबर 5 च्या बाहेर शेरशहा सुरी मार्गावर रिसेप्शन हाऊसजवळ हा स्फोट झाला. एका ब्रिफकेसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. बॉम्बस्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर केल्याची प्राथमिक माहिती आहे. IED च्या द्वारे हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती गृहसचिव यू. के. बन्सल यांनी दिली आहे. स्फोटाचा तपास NIA कडे देण्यात आलाय. फॉरेन्सिक टीमनं स्फोटाच्या ठिकाणचे नमुने तपासासाठी घेतलेत. त्यांच्या रिपोर्टनंतर स्फोटाबाबत नेमकी माहिती मिळू शकेल. स्फोटाची जबाबदारी हुजी या अतिरेकी संघटनेनं स्वीकारलीय. मीडियाला हुजीनं ई-मेल पाठवल्याची माहिती NIA चे प्रमुख एस.सी. सिन्हा यांनी दिलीय. जखमींना राममनोहर लोहिया, एम्स आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मृतांच्या नातेवाईकांना दिल्ली सरकारकडून 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गंभीर जखमींना 1 लाख, तर किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. स्फोटानंतर दिल्ली आणि मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

हाय कोर्ट परिसरात जिथे बॉम्बस्फोट झाला तिथून संसद 9 मिनिटांवर आहे . इंडिया गेट परिसर 3 मिनिटांवर आहे. तर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA), ऑगस्ट क्रांती मैदान आहेत. जवळच आंध्रप्रदेश भवन, हैदराबाद हाऊस, रक्षा भवन यासारख्या महत्वाच्या वास्तू आहेत.

केंद्रीय गृहमत्र्यांचं निवेदन

केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी आज या बॉम्बस्फोटांसंदर्भात लोकसभेत निवेदन दिलं. स्फोटामागे कोण आहेत, स्फोटामागे कोणती संघटना हे आताच सांगणं कठीण आहे असं ते म्हणाले. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी दिल्ली बाँम्बस्फोटाचा तपास करेल अशी माहितीही त्यांनी दिली. इंटेलिजन्स सर्व्हिसेस सतत दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहेत. हा स्फोट उच्च क्षमतेचा होता. हा बॉम्ब ब्रिफकेसमध्ये ठेवला होता अशी माहितीही गृहमंत्र्यांनी सभागृहाला दिली. सर्व देशात हाय अलर्ट जारी करण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं जाहीर केलं. गृहमंत्री चिदंबरम यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलिस अधिका•यांशी तसंच दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधिशांशीही त्यांनी चर्चा केली.

दिल्लीत झालेले बॉम्बस्फोट

23 मे, 1996 : लजपतनगर इथे झालेल्या स्फोटात 16 ठार

10 ऑक्टोबर, 1997 : दिल्लीत 3 स्फोटांमध्ये 1 ठार 16 जखमी

18 ऑक्टोबर, 1997 : राणीबाग मार्केटमध्ये झालेल्या स्फोटात 1 ठार, 23 जखमी

26 ऑक्टोबर, 1997 : करोल बागेत झालेल्या दोन स्फोटांमध्ये 1 ठार, 34 जखमी

30 नोव्हेंबर, 1997 : रेड फोर्ट परिसरात झालेल्या दोन स्फोटांमध्ये 3 ठार, 70 जखमी

30 डिसेंबर, 1997 : पंजाबी बाग परिसरात बसमध्ये झालेल्या स्फोटात 4 ठार, 30 जखमी

22 मे, 2005 : दोन सिनेमा थिएटरमधील स्फोटांमध्ये 1 ठार

ऑक्टोबर 2005 : दिवाळीच्या आधी 3 स्फोट झाले. 62 ठार, 100 जखमी

27 सप्टेंबर, 2008 : गजबजलेल्या मेहरोली मार्केटमध्ये झालेल्या स्फोटात 3 ठार

13 सप्टेंबर 2008 – करोल बाग, कॅनोट प्लेस आणि ग्रेटर कैलास या तीन ठिकाणी झालेल्या स्फोटात 25 जण ठार, 150 जखमी

19 सप्टेंबर, 2010 : जामा मस्जिदजवळ स्फोट

25 मे 2011 : दिल्ली हायकोर्टाबाहेर स्फोट, जखमी नाही

close