बॉम्बस्फोटाचा हुजीचा ई-मेल जम्मूतून ; 4 अटकेत

September 8, 2011 7:27 AM0 commentsViews: 5

08 सप्टेंबर

दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेणारा हुजीनं पाठवलेला ई मेल जम्मूतून पाठवण्यात आल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. किश्तवार भागातल्या एका सायबर कॅफेतून हा मेल पाठवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली. या सायबर कॅफेच्या मालकाची आता पोलीस चौकशी करत आहे.

त्याचबरोबर हा मेल कोणी पाठवला याचीही कसून चौकशी सुरू आहे. या संदर्भात किश्तवारमधून सायबर कॅफेच्या मालकासह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान दिल्ली पोलिस आता एका कारचा शोध घेत आहे. ती हुंदाई आय 10 किंवा सँट्रो कार असावी असा त्यांचा कयास आहे. त्याचबरोबर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी या गाडीचा वापर करण्यात आल्याचाही संशय आहे.

दरम्यान दिल्ली स्फोटाबाबत काही लोकांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिल्लीचे डीजीपी कुलदीप खुडा यांनी दिली. तर दुसरीकडे दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या तपासात एनआयए(NIA) नं फायर ब्रिगेडची मदत घेतली. स्फोट झाला त्या परिसरातल्या झाडांवर काही अवशेष मिळतात का याचा शोध घेतला जातोय. फॉरेन्सिक चाचणीसाठी ते पुरावे पाठवले जाणार आहे.

दरम्यान दिल्ली हायकोर्टाच्या बाहेर आज कडक बंदोबस्ट ठेवण्यात आला आहे. तर तिकडे गृहमंत्रालयात महत्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला गृहमंत्री पी चिदंबरम, रॉ आणि आयबीचे प्रमुख, एनआयए (NIA) चे प्रमुख यांच्यासह गृहमंत्रालयातील महत्वाचे अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत दिल्लीतल्या सुरक्षेचा आढावा घेणार असल्याचं समजतंय.

close