इंडियन मुजाहिद्दीननेही स्वीकारली जबाबदारी

September 8, 2011 11:21 AM0 commentsViews: 3

08 सप्टेंबर

दिल्ली बॉम्बस्फोट नेमका कोणी घडवला याचं गूढ वाढलं आहे. कारण आता इंडियन मुजाहिद्दीनने या बाँम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. इंडियन मुजाहिदीनच्या नावाने मीडियाला ई मेल आला आहे. या मेलमध्ये या संघटनेनं आपणच हा स्फोट घडवला असा दावा केला. याप्रकरणी आज 5 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांची चौकशी सुरू आहे. स्फोटाचा तपास नेमका कोणत्या दिशेनं सुरू आहे.

दिल्लीतल्या बॉम्बस्फोटानंतर दुसर्‍या दिवशी तपास यंत्रणांची घाई उडाली ती पुरावे गोळा करण्यासाठी एनआयए (NIA) चं पथक सकाळी बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी पोचलं आणि धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला. हायकोर्टाच्या सर्व परिसराची त्यांनी कसून पाहणी केली. पण दुसर्‍या दिवसाच्या अखेरही अतिरेक्यांपर्यंत पोचण्यासाठी तपास यंत्रणांच्या हाती फारसे धागेदोरे मिळाले नाहीत. दिल्ली पोलिसांना फरिदाबादमध्ये एक ह्युंडाई कार मिळाली. दहशतवाद्यांनी पळून जाण्यासाठी याचा वापर केला असावा असा संशय घेण्यात आला. पण त्यातूनही फारसं काही हाती लागलं नाही.

तपासात दुसरा एक सुगावा लागला आहे. तो म्हणजे हुजीचा ई-मेल जम्मूतल्या किश्तवार भागातल्या सायबर कॅफेतून पाठवण्यात आल्याचं समजलं. कॅफेचा मालक आणि इतर तिघांना ताब्यात घेण्यात आलं. पण, तपास यंत्रणांच्या मते हा ई-मेल अफवा पसरवण्यासाठी पाठवण्यात आला. गुरुवारी दुसरा एक ई-मेल मीडियाला मिळाला. इंडियन मुजाहिद्दीननं हा ई-मेल पाठवल्याचा संशय आहे. इंडियन मुजाहिद्दीननं बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आणि अशाच प्रकारचे आणखी हल्ले करण्याची धमकीही दिली. तसेच देशातील शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये स्फोट घडवून आणू असा इशाराही मुजाहिद्दीनने दिला. हा ई-मेल कुठून आला, याचा तपास एनआयए करतंय.

पंजाब, राजस्थान, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकं शुक्रवारी एनआयएचे प्रमुख आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत. सर्वांचं लक्ष लागलंय ते सविस्तर फॉरेन्सिक अहवालाकडे हा अहवाल मिळाल्यानंतर बॉम्बचं नेमकं स्वरूप समजू शकतं. आणि त्यातून हल्लेखोरांचा छडा लावण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.

दरम्यान, बॉम्बस्फोटातल्या मृतांची संख्या आता 12 झाली. 34 वर्षांच्या तारसेम सरुप सिंग यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. स्फोटात मृत्यमुखी पडलेल्या बारा जणांपैकी अकरा मृतदेहांची ओळख पटली. दुसरीकडे राम मनोहर लोहिया हॉस्पिटलबाहेर बॉम्बस्फोटातल्या मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांनी आज निदर्शनं केली. हॉस्पिटल प्रशासन रुग्णांना भेटू देत नसल्याचा आरोप या नातेवाईकांनी केला. यावेळी त्यांनी घोषणाबाजीही केली.

close