बाप्पा जरा जपून…खड्डे आहेत !

September 8, 2011 6:09 PM0 commentsViews: 24

08 सप्टेंबर

मुंबईतील खड्डे आज रात्रीपर्यंत बुजवावेत अशी डेडलाईन गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेला दिली. त्यावर खड्डे बुजवले जातील असं ठोस आश्वासन मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी दिलं होतं. पण खड्डे काही बुजवले गेले नाहीत. गणपतीचं आगमन याच खड्डेमय रस्त्यावरून झाले. आता विसर्जन तोंडावर आलंय तरीही खड्डे बुजवण्याच्या डेडलाईनचं सोयरसुतक कोणालाच नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची डेडलाईन आता खड्‌ड्यात गेल्याचं स्पष्ट झालंय. खड्डयांचे हे विघ्न केवळ मुंबईतच आहे असं नाही तर राज्याभरातील तीच परिस्थिती आहे. राज्यातील गणरायाचे आगमन खड्‌ड्यांमधून झालं आता त्यांचे विसर्जनही खड्‌ड्यांमधूनच करावे लागणार का असा प्रश्न विचारला जातोय.

खडी माती अन् खड्डे !

येत्या रविवारी गणरायाचं विसर्जन होणार आहे. मात्र अजूनही विसर्जनाच्या मार्गांवरचे खड्डे ठाणे महापालिकेने खड्डे बुजवलेले नाहीत. काही ठिकाणी खडी आणि माती टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तोही यशस्वी झालेला नाही. यामुळेच विसर्जनाच्या वेळेस गणेश मंडळांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणारं आहे. ठाण्यातील कळवा मधल्या खारीगाव खाडी आणि ठाण्यातल्याच कोलशेतमधील या खड्‌ड्यांबद्दल हीच परिस्थिती आहे.

खड्डे बुजविण्यासाठी चक्क पेव्हरब्लॉक !

औरंगाबाद शहरातल्या जालना रोडवर सध्या खड्डे बुजविण्यासाठी चक्क पेव्हरब्लॉक म्हणजेच गट्टू वापरले जात आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे जिथे खड्डे नाहीत तिथे पहारीने खोल खड्डा करून पेव्हर ब्लॉक बसविले जात आहेत. पावसाळ्यात डांबरीकरणाच्या पॅचवर्कची कामे होत नाहीत म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने हा खटाटोप चालविला आहे.

कंपनी ऐकेना..खड्डे बुजेना !

अनंत चतुर्दशीला आता दोनच दिवस शिल्लक आहेत. मात्र तरीही गणपती विसर्जनाच्या मार्गावरचे खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे खड्‌ड्यांमधून गणेश मूर्ती न्यायच्या कशा असा प्रश्न कोल्हापूरच्या गणेश मंडळांना पडला. कोल्हापूरमध्ये विकास कामांसाठी खोदकाम करणार्‍या आयआरबी (IRB) कंपनीला याबाबत अनेकदा सांगूनही खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत.

close