मुंबईत 2 हजार डॉक्टर संपावर

September 9, 2011 9:22 AM0 commentsViews: 1

09 सप्टेंबर

मुंबईकरांना पुन्हा एकदा डॉक्टरांच्या संपाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमधील 2150 डॉक्टर्स बेमुदत संपावर गेले आहे. काल गुरूवारी डॉक्टरांनी संप पुकारला होता. या दरम्यान संपावर तोडगा काढण्यासाठी बैठकीही पार पडली होती. मात्र बोलणी फिस्कटल्यामुळे संप सुरूच ठेवण्याचा निर्णय सायनच्या डॉक्टरांनी घेतला आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून केईएम आणि नायर हॉस्पिटलचे डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहे.

बुधवारी रात्री सायन हॉस्पिटलमध्ये एका 10 महिन्यांच्या मुलीचा न्युमोनियामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांनाच मारहाण केली. यात एका डॉक्टरचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या मारहाणीविरोधात डॉक्टर्स संपावर गेले आहेत. यात मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमधील सतराशे आणि जे जे हॉस्पिटलमधील साडे चारशे डॉक्टर्सचा समावेश आहे. नेहमी पेशंटच्या रूग्णाकडून डॉक्टरांना होत असलेल्या मारहाणीविरोधात कडक पावलं उचलावी अशी मागणी डॉक्टरांची आहे.

दरम्यान, औरंगाबाद मध्येही बुधवारी रात्री डॉक्टरांना मारहाण झाल्याने औरंगाबाद शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टरांनीही मुंबईच्या डॉक्टरांना पाठिंबा देत संप सुरु केला आहे. यामुळे रुग्णांना अडचणी येत आहेत. मात्र महत्वाच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. दरम्यान मारहाणीप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक होईपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने घेतली आहे. त्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.

close