गिडवानींची ‘आदर्श’ करामत !

September 10, 2011 12:01 PM0 commentsViews: 9

आशिष जाधव, मुंबई

10 सप्टेंबर

आदर्श घोटाळ्यातील गुंता आता जास्तचं वाढत चालला आहे. आदर्श सोसायटीचे को-प्रमोटर कन्हैय्यालाल गिडवानी यांनी आता एक गौप्यस्फोट करुन नारायण राणे आणि बाबासाहेब कुपेकर यांना अडचणीत आणलं आहे.

आदर्शच्या न्यायालयीन आयोगाच्या सुनावणीत अनेक नवे खुलासे होत आहे. माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी आदर्शच्या वाढीव एफएसआयसाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पत्र लिहून प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट आदर्श सोसायटीचे को-प्रमोटर कन्हैय्यालाल गिडवानी यांनी केला.

तसेच आदर्श आणि एमएमआरडीएमधील भाडेकरार पूर्ण व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची विनंती माजी महसूलमंत्री नारायण राणे यांना आपण पत्र लिहून केल्याचंही गिडवानी यांनी आपल्या जबानीत म्हटलंय. कन्हैय्यालाल गिडवानी यांनी न्यायालयीन आयोगाच्या सुनावणीदरम्यान नेमके कोणकोणते खुलासे किंवा गौप्यस्फोट केले.

- राजकीय हितसंबंधातून आदर्शसाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मिळवण्याची जबाबदारी स्वतःच घेतली होती.- 11 ऑगस्ट 2009 ला गिडवाणींनी सोसायटीच्या अध्यक्षांना त्या आशयाचं पत्र लिहिलं- आदर्शला केंद्रीय पर्यावरण खात्याची एनओसी नाही, अशी कबुली गिडवाणी यांनी दिली- 11 नोव्हेंबर 2003 ला केंद्रीय पर्यावरण खात्याने जारी केलेलं पत्र हे एनओसी नसून तो खुलासा होता- या खुलासा पत्राला राज्याच्या नगरविकास खात्याने एनओसी दाखवून बांधकामाला परवानगी दिली

- ऑक्टोबर 2010 मध्ये तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांना पत्र लिहिलं. आदर्श आणि एमएमआरडीए यांच्यातील भाडेकरार पूर्ण करण्यासाठी विनंती केली. हा भाडेकरार झाल्यावर आदर्शला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट जारी झाले. याची कबुली गिडवानींनी आयोगासमोर दिली.

- आदर्शला केंद्रीय पर्यावरण खात्याची एनओसी नाही, अशी स्पष्ट कबुली गिडवानी यांनी दिलीय. यासंदर्भात 11 नोव्हेंबर, 2003 ला केंद्रीय पर्यावरण खात्याने जारी केलेले पत्र हे एनओसी नव्हते, तर तो खुलासा होता. पण याच खुलाश्याला राज्याच्या नगरविकास खात्याने एनओसी समजून आदर्शच्या बांधकामाला परवानगी दिली, अशी माहिती गिडवानी यांनी आयोगाला दिली.

कन्हैय्यालाल गिडवानी यांच्या न्यायालयीन आयोगासमोरील जबानीमुळे आदर्शचा गुंता वाढला आहे. तसेच अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता निर्माण झालीय. पुढच्या आठवड्यातही गिडवानी यांची आयोगासमोर ऊलटतपासणी होणार आहे. आता नारायण राणेंच्या निमित्ताने राज्याचे पाच माजी मुख्यमंत्री या प्रकरणाशी जोडले गेले आहेत.

close