बराक ओबामा यांनी वाहिली मृतांना श्रद्धांजली

September 11, 2011 4:53 PM0 commentsViews: 5

11 सप्टेंबर

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या सर्वात भीषण हल्ल्याला आज दहा वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने अमेरिकेत ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीसुद्धा ग्राउंड झिरोवर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु बुशही सहकुटुंब उपस्थित होते. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हा दिवस सेवा दिन म्हणून साजरा केला. त्यांनी सहकुटुंब एका हॉटेलच्या किचनमध्ये काम केलं.

'ग्राऊंड झिरो' वरून आकाशाकडे झेप

2001 मध्ये न्यूयॉर्कमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टिवन्स टॉवरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात हे ट्वीन टॉवर्स जमीनदोस्त झाले. या घटनेला आज तब्बल 10 वर्ष पूर्ण झाली. आणि आता त्याजागी एक भव्य स्मारक आणि एक वास्तू उभी राहत आहे.

अमेरिकेचं ऐश्वर्य असलेल्या टिवन्स टॉवरवर अचानक एक विमान येऊन आदळलं. सगळीकडे प्रचंड गोंधळ उडाला. तेवढ्यात आणखी एक विमान टॉवरवर येऊन आदळलं. आणि आगीच्या भीषण लोळात अमेरिकेचं गगनचुंबी ऐश्वर्य काही क्षणात उद्‌ध्वस्त झालं. 11 सप्टेंबर 2001 च्या त्या दिवशी, त्या क्षणाला आपण नेमकं काय करत होतो हे आपण सांगू शकतो.

हिस्ट्री चॅनलनं 102 मिनीटांची एक डॉक्युमेंट्री बनवली. त्यात त्यांनी पर्यटक, व्यावसायिक आणि नागरीकांना बोलतं केलंय. आणि मिनीटा-मिनीटाचे चित्रण करून ते सगळं भीषण दृष्य उभं केलंय. आता या घटनेला 10 वर्षे पूर्ण होताहेत. पण 10 वर्षापूर्वी उद्‌ध्वस्त झालेलं हे आर्थिक केंद्र आज 10 वर्षांनंतर पहिल्यापेक्षा आणखीनंच भव्य आणि प्रगत झालं आहे.

त्या दहशतवादी हल्ल्यानंतर या जागेला ग्राऊंड झिरो म्हणून ओळखलं जायचं. पण आता इथं नव्यानं अमेरिकेचं ऐश्वर्य उभारलं जातंय. या इमारती 2013 च्या अखेरीस पूर्ण होतील. पण आज इथं एक भव्य स्मारक आणि म्यूझियम बांधून तयार झालंय. त्याचं 11 सप्टेंबरला राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते उद्घाटन झालं. दहा वर्षांपूर्वी झालेल्या भीषण हल्ल्यानंतर अमेरिका खचली नाही तर ती अधिक निर्धारानं नव्यानं उभी राहिली हेच यातून दिसून येतंय.

close