मोदींसाठी राष्ट्रीय राजकारणात मार्ग मोकळा ?

September 12, 2011 5:47 PM0 commentsViews: 20

12 सप्टेंबर

राष्ट्रीय राजकारणात भाजपचे एक खंदे उमेदवार अशी मोदींची प्रतिमा नेहमीच रंगवण्यात येतेय. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे आता मोदींना राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाची संधी मिळेल अशी चर्चाही आता सुरू झाली. पण अनेक आरोपांच्या गर्तेत सापडलेल्या मोदींसाठी हा मार्ग अजून तेवढा सोपा नाही.

स्वत:ला गुजरात का शेर म्हणवून घेणार्‍या नरेंद्र मोदींसाठी सोमवारचा दिवस निर्णायक होता. गेल्या पूर्ण दशकामध्ये मोदींचे राजकारण त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती केंद्रीत झालंय. प्रभावी वक्तृत्वशैली, गुजरातचे सीईओ आणि हिंदुत्वाचे हिरो म्हणून स्वत:ला सादर करण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे मोदी भाजपमध्ये सर्वात शक्तिशाली नेता म्हणून ओळखले जातात. सुप्रीम कोर्टाच्या सोमवारच्या निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी मोदींचा बळकट होऊ शकतो.

मोदींचे एक महत्त्वाचे सहकारी आणि राजकीय विश्लेषक स्वपन दासगुप्ता यांनी कोर्टाचा हा निर्णय मोदींसाठी कसा महत्त्वाचा आहे हे टिविटरवर लिहिलं आहे. ते म्हणतात, " मोदींचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर राहूनही ते राष्ट्रीय राजकारणात जाऊ शकतात. यासाठी भाजपने तत्काळ हालचाल करायला हवी."

पण मोदींना एका प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी अजून अनेक प्रकरणं त्यांची पाठ सोडायला तयार नाहीत.गोध्रा हत्याकांडाची आठवणही त्यांना नकोशी अशीच आहे. पण याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं तरीही आणखी बरेच वादग्रस्त मुद्दे उरतातच.

सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती यांच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी मोदींचा उजवा हात असलेले अमित शाह यांचं मंत्रिपद गेलं. या एन्काउंटरच्या कटाची माहिती मोंदींनासुद्धा होती, का असे प्रश्न विचारले जात आहे. गुजरातमध्ये सात वर्षं लोकायुक्त नव्हते. स्वत:च्या पसंतीचा लोकायुक्त असावा या मोदींच्या इच्छेमुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये संसदेत चांगलीच जुंपली.

औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी त्यांनी कॉर्पोरेट सेक्टरला बाजारभावापेक्षा कमी किंमतीने जमीन देण्याचा निर्णय घेतला. त्यालाही अनेकांनी आक्षेप घेतले. गेल्या काही महिन्यांपासून मोदी आपल्या पोलीस अधिकार्‍यांना जाणूनबुजून टार्गेट करतायत असा आरोप होतो.

पण आपल्या विरोधात जाणार्‍या गोष्टींचं संधीत रूपांतर करण्यात मोदी चांगलेच पटाईत आहेत. त्यांच्या या गुणवैशिष्ट्यावर ते सगळ्यात जास्त अवलंबून असतात. आणि त्यामुळेच या कायदेशीर लढाईत कशी पावलं टाकायची याची तयारीही त्यांनी आधीच केलेली असणार.

close