ऐतिहासिक नगरीत 10 हजार खड्‌ड्यांचे साम्राज्य

September 12, 2011 3:25 PM0 commentsViews: 11

12 सप्टेंबर

औरंगाबाद शहरातील मुख्य रस्त्यांवर साडेपाच हजार खड्डे पडले आहेत. आतल्या रस्त्यांवरचे खड्डे मोजले तर दहा हजारांहून जास्त भरतील, असे महापालिकेचे अधिकारीच मान्य करत आहेत. शहराची अशी अवस्था असताना शिवसेनेमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.

रस्त्यांवरच्या या खड्‌ड्यांमुळे औरंगाबादकर अक्षरश: हैराण झाले आहेत. शहरातला एखादा रस्ता वगळला तर सगळ्या मुख्य रस्त्यांची चाळणी झाली आहे. हे खड्डे बुजवण्याऐवजी महापालिकेने हे खड्डे मोजण्याचं काम सुरू केलं. आणि शहरातल्या रस्त्यांचं आयुष्य संपल्याचा अहवाल तयार केला.

शहर अभियंता एम डी सोनवणे म्हणतात, रस्त्यांची अवस्था वाईट आहे हे खरे आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर साडेपाच हजार खड्डे पडलेत. हे मुख्य रस्त्यावरील ख़ड्डे आहेत. आऊटस्कर्टला मोजलेत तर साडेदहा हजार खड्डे होतील. रस्ते खराब झाल्यामुळे आयुक्तांनी इंजिनिअर्सवर कारवाई करण्याची भूमिका घेतली. यावर 40 इंजिनिअर्सनी सामूहिक राजीनामे देण्याची स्टंटबाजी केली.

पुरुषोत्तम भापकर म्हणतात, रस्त्याची पाहणी केली आता दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शहरातील रस्ते खड्डयात गेलेत आणि सत्ताधारी शिवसेनेत मात्र अंतर्गत संघर्ष आणि धुसफूस सुरू आहे. त्यामुळे महापालिकेचा कारभारच डळमळीत झाला आहे. महापौर अनिता घोडेले यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलंय. "रस्ते दुरूस्तीसाठी साडेचारशे कोटी लागणार आहेत, ते सरकारने द्यावेत. तसेच मला सर्वंच नेत्यांचे मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी चांगले काम करू शकते. असं मत महापौरांनी व्यक्त केलं.

राज्यभरात पराभवाची मालिका सुरू असताना औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेला घवघवीत यश मिळालं. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी या महापालिकेत स्वत: लक्ष घालीन, असं आश्वासन दिलं होतं. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच पक्षात लाथाळ्या सुरू आहेत आणि यात शहरातली विकासकामं पूर्णपणे मागे पडली आहे.

close