छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचे निधन

September 13, 2011 10:32 AM0 commentsViews: 9

13 सप्टेंबर

फोटोग्राफीला ग्लॅमरस बनवणारे बॉलीवूडचे लाडके फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांचं आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 61 वर्षांचे होते. पोट्रेट फोटोग्राफीमध्ये हातखंडा असलेले गौतम राजाध्यक्ष अनेक कलाकार, उद्योगपती, राजकारण्यांच्या जीवलग होते.

16 सप्टेंबर 1950 ला मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी केमिस्ट्री विषयात पदवी घेतली. तिथं त्यांनी काही काळ शिकवलंही. पण आपली पॅशन काही वेगळंच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपला मोहरा फोटोग्राफीकडे वळवला.1974 मध्ये त्यांनी लिंटास या प्रसिद्ध जाहिरात कंपनीत फोटोग्राफीच्या करिअरला सुरूवात केली.

1980 मध्ये त्यांनी फॅशन फोटोग्राफीला सुरूवात केली. शबाना आझमी, टीना मुनिम यांच्यासोबत त्यांनी पहिली फॅशन फोटोग्राफी केली. त्यानंतर मग 1987 पासून त्यांनी स्वतंत्रपणे पूर्णवेळ फोटोग्राफीला सुरूवात केली. बॉलीवूडच्या दुर्गा खोटे ते अगदी ऐश्वर्या रायपर्यंत सगळ्याच बॉलीवूड कलाकारांना त्यांनी कॅमेर्‍यात बंद केलं. त्यांच्याबरोबर काम करायला प्रत्येकजण नेहमीच उत्सुक असायचा. सहजता आणि निखळपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य होती.

त्यामुळेच राजेश खन्ना आणि अमिताभ यांचा एकत्र फोटो असो किंवा शोभना समर्थ, तनुजा आणि काजोल या तीन कलाकारांच्या पिढ्यांचा फोटो असो. त्याला खास राजाध्यक्ष टच लाभायचा. त्यांचं फेसेस हे कॉफी टेबल पुस्तक 1997 मध्ये रिलीज झालं. त्यानंतर 2000 मध्ये पुण्यात त्यांच्या फोटोंचं पहिलं प्रदर्शन भरलं. राजाध्यक्ष यांच्या जाण्यानं एक मनस्वी कलाकार आणि आपला अगदी जवळचा मित्र हरपल्याची भावना प्रत्येक कलाकारनं व्यक्त केली.

close