ओरीसात पुराच थैमान ; 34 मृत्यूमुखी

September 14, 2011 12:35 PM0 commentsViews: 9

14 सप्टेंबर

ओरीसामध्ये सध्या पुरानं थैमान घातलं आहे. आत्तापर्यंत या पुरात 34 जणांचा बळी गेला आहे. तर 9 जिल्ह्यातल्या तब्बल 20 लाख लोकांना याचा फटका बसला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार सगळे प्रयत्न करतंय असं सांगितलं जातंय, पण आपल्यापर्यंत कोणतीही मदत यंत्रणा पोहोचली नाही असं नागरीकांचं म्हणणं आहे.

पुराच्या तडाख्यात सापडलेल्या नागरिकांचा सुरक्षितस्थळी पोहोचण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरु आहे. हजारो नागरिकांनी सध्या हायवेवरतीच आसरा घेतला आहे. 10 वर्ष वयाची कंधाई आणि तिचं कुुटंब पुरामुळे बेघर झालं आहे. आता त्यांच्याकडे खायला अन्न नाही आणि प्यायला स्वच्छ पाणी नाही. कोठूनतरी सरकारची काही मदत मिळेल या आशेवर ते जगताहेत. 62 वर्षीय लता यांच्या घराला पूराचा मोठा फटका बसला आहे. लता आणि त्यांच्या नातवांना आता आशा आहे ती त्यांना त्यांचा आसरा पुन्हा मिळेल याची.

ओरीसातील अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यातील 20 लाख लोकांना या पुराचा फटका बसला. पुरी, केंद्रपूरा, कटक, जजपूर आणि सम्बलपूर या सारख्या अनेक जिल्ह्यांचा यात समावेश आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत 60 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. त्यासाठी ओरीसा डिझास्टर रॅपिड ऍक्शन फोर्सकडून युद्धपातळीवर मदत कार्य सुरु आहे. त्याचबरोबर भारतीय नौसेनाही मदत कार्यासाठी पुढं सरसावली.

वरून मुसळधार पाऊस पडतोय. त्यात समुद्राला आलेल्या भरतीमुळे नद्यांच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पुरी जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यातून मार्ग काढणं हे सरकारच्या यंत्रणांपुढंचं सर्वात मोठ्ठं आव्हान असणार आहे.

close