जम्मूत 2 जणांना अटक

September 14, 2011 5:48 PM0 commentsViews: 5

14 सप्टेंबर

दिल्ली हायकोर्टाच्या बाहेर गेल्या बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीत महत्त्वाची धागेदोरे हाती लागले आहेत असा दावा केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी केला. एनआयए (NIA) नं जम्मूतल्या किश्तवारवर लक्ष केंद्रीत केलं आहे. जम्मू पोलिसांनी 11 वीत शिकणार्‍या 2 मुलांना ताब्यात घेतलं आहे. स्फोटानंतर किश्तवारमधून आलेल्या ई-मेल बाबत त्यांची चौकशी सुरू आहे. हुजीने स्फोटाची जबाबादारी घेतल्याचा दावा करणारा हा ई-मेल होता.

एनआयएनं तिसर्‍या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. या व्यक्तीने या दोन मुलांना पेन ड्राईव्ह दिला होता. आणि त्यातल्या माहितीनुसार ई-मेल करायला सांगितलं होतं असा पोलिसांना संशय आहे. ही अनोळखी व्यक्ती स्फोटाच्या तपासात महत्त्वाचा दुवा ठरू शकते असं तपास यंत्रणांना वाटतंय.

दरम्यान, आपली मुलं निर्दोष असल्याचा दावा ताब्यात घेण्यात आलेल्या दोन मुलांच्या कुटुंबीयांनी केला. स्फोटानंतर मीडियाला 1 वाजून 14 मिनिटांनी ई-मेल मिळाला होता. पण कॉम्प्युटरमधून तो ई-मेल 1 वाजून 38 मिनिटांनी सेंट झाल्याचं दिसतंय. या 24 मिनिटांच्या फरकाकडे मुलांच्या कुटुंबीयांनी लक्ष वेधलंय. पण, वेगवेगळ्या देशात वेगवेगळी वेळ असल्याने हा फरक होऊ शकतो असा तपास यंत्रणांचा दावा आहे.

ई-मेलची पाठवल्याच्या आणि मिळाल्याच्या वेळेत फरक आहे. पण, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कॉम्प्युटरमध्ये छेडछाड केल्याचा दावा पोलिसांनी केला. दरम्यान, स्फोटाचा तपास किमान चार राज्यांत सुरू आहे. तपास यंत्रणा किश्तवार, अहमदाबाद, मीरत आणि कोलकातामध्ये तपास करत आहे.अटक केलेल्या दोन मुलांना जम्मूतून दिल्लीत आणलं जाणार आहे. त्यामुळेच तपासाच्या दृष्टीने पुढचे काही दिवस एनआयएसाठी महत्त्वाचे आहेत.

close