बोगस विद्यार्थ्यांच्या छडा लावण्यासाठी ‘नांदेड पॅटर्न’ची छडी !

September 16, 2011 12:10 PM0 commentsViews: 8

16 सप्टेंबर

शाळांमधील खरी विद्यार्थी संख्या तपासण्यासाठी नांदेड जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेत तब्बल एक लाख 35 हजार विद्यार्थीसंख्या बनावट असल्याचे आढळून आलंय. सात लाख विद्यार्थ्यांपैकी एक लाख पस्तीस हजार विद्यार्थी म्हणजे वीस टक्के विद्यार्थी बनावट असल्याचे उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. नांदेडच्या पॅटर्ननुसार राज्यभरात पाहणी केल्यास सरकारी तिजोरीतील तीन हजार कोटी रूपयांचे अनुदान वाचू शकते अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये बनावट विद्यार्थी संख्या शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक मोहीम राबविली. राज्यभरात अशी मोहीम राबविण्यासाठी पथदर्शी कार्यक्रम तयार व्हावा या उद्देशाने नांदेडची निवड करण्यात आली होती. या तपासणीत 696 शाळा आणि एक लाख 35 हजार विद्यार्थी बनावट असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली.

या मोहिमेचं काम करण्यासाठी 4 हजार कर्मचारी आणि साडेचारशे वाहनं वापरण्यात आली. मतदानाच्यावेळी लावण्यात येणारी शाई विद्यार्थीची पटसंख्या तपासताना लावण्यात आली. शिवाय एका ठराविक काळातच तपासणी पूर्ण केल्यामुळे संस्थाचालकांचं पितळ उघडं पडलं.

अशी भरती शाळा- बनावट आकडेवारी – काही ठिकाणी शहरातली मुलं आश्रमशाळेत – कॉलेजचे तरुण शिक्षकांच्या जागेवर – विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहारही निकृष्ट दर्जाचा

बनावट विद्यार्थीसंख्या शोधून काढणारा नांदेडचा हा पॅटर्न राज्यभरात राबवला तर बनावट शाळा आणि तुकड्या बंद पडून सरकारच्या तिजोरीवरचा भार कमी होईल, त्यामुळे या पॅटर्नचं स्वागतच करायला हवं.

close