जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 17 नोव्हेंबरला मतदान

November 16, 2008 3:49 PM0 commentsViews: 17

17 नोव्हेंबर, जम्मू काश्मीरजम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या होतंय. यात गुरेझ, बंदिपोरा, सोनावरी, नोबरा, लेह, कारगील, झांस्कर, सुरनकोट, मंधर, आणि पुँछ-हवेली या दहा जागांचा समावेश आहे. निवडणुकांना सामोरे जाणार्‍या जवळपास सर्व पक्षांच्या जाहीरनाम्यात अमरनाथ जमीन प्रकरण, दहशतवाद समाप्त करून राजकीय स्थिरता आणणे, विकास, रोजगार, महिला सबलीकरण असे जवळपास सारखेच मुद्दे आहेत. तसंच स्वायत्तता हा मुददाही काही प्रमुख पक्षांच्या अजेंड्यावर आहे. पहिल्या टप्प्यातला प्रचार थंडावला असून उद्याच्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागलीय. 10 जुलै 2008 पासून राजकीय अस्थिरतेच्या कारणामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान 87 मतदारसंघात एकूण सात टप्प्यात हे मतदान पार पडणार आहे. मतदान शांततेत पार पडावं यासाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल, तसंच मतदार आणि उमेदवार यांच्या सुरक्षेचीही पूर्ण खबरदारी घेण्यात येईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. तसंच निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजप, काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष तर नॅशनल कॉन्फरन्स आणि पिपल डेमोक्रेटीक पार्टी हे दोन प्रादेशिक पक्ष यांच्यामध्ये या निवडणुकीत प्रामुख्यानं लढत होत आहे.

close