भूकंपानं उत्तर-पूर्व भारत हादरला ; 7 बळी

September 18, 2011 3:27 PM0 commentsViews: 6

18 सप्टेंबरदेशाच्या उत्तर-पूर्व भागात आज संध्याकाळी सव्वा सहा वाजता एका मोठ्या भूकंपाने हादरा दिला. त्यानंतरही याभागात भूकंपाचे तीन धक्के बसले. या भूकंपाचं केंद्र सिक्कीममध्ये होतं. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी मोजण्यात आली. गंगटोकपासून 64 किलोमीटर वायव्येला भूकंपाचं मुख्य केंद्र होतं. या भूकंपामुुळे भारतात आत्तापर्यंत एकूण 7 जणांच्या मृत्यूची बातमी येतेय. सिक्कीमसह संपूर्ण उत्तर-पूर्व भागात मोठं नुकसान झालं आहे.

200 किलोमीटर अंतरावरच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सिक्कीममध्ये एका बालकासह चौघांचा मृत्यू झाला. तर रस्ते आणि इमारतींना तडे गेले आहेत. अनेक भागात विद्युत पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. मोबाईल टॉवरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे फोन लाईन्सही ठप्प झाल्या आहेत. निमलष्करी दल मदतकार्य करतं आहे. पण मुसळधार पावसामुळे बचाव कामातही अडथळे येत आहेत.पश्चिम बंगालमधील सिलीगुडीपासून ते सिक्कीमच्या गंगटोक पर्यंतचा नॅशनल हायवे 31-एसुद्धा बंद झाला आहे.

तर दुसरीकडे पश्चिम बंगाललाही भूकंपाचा तडाखा बसला आहे. इथे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याहेत तर एकाचा मृत्यू झाला आहेत. भूकंपावेळी अनेक लोक जीव वाचवण्यासाठी सैरभैर पळू लागल्यामुळे चेंगराचेंगरीसुद्धा झाली. सिलीगुडी, जलपाईगुडी आणि कूंच बिहार या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान झालंय. बिहारमध्येसुद्धा हीच परिस्थिती आहे. भागलपूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तिचा मृत्यू झाला. तर नालंदामध्येही एकाचा मृत्यू झाला.

कटीहारमध्ये भूंकपामुळे 2 इमारती कोसळल्या आहेत. दिल्लीतही भूकंपाचे झटके बसले आहेत. नेपाळमध्ये ही पाच जणांचा भूकंपामुळे मृत्यू झाला आहे. नेपाळमधील ब्रिटीश दूतावासाच्या इमारतीचंही भूकंपामुळे काही प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान, मदतकार्यासाठी आज रात्री वायु दलाची पाच विमानं बागडोगरापर्यंत पाठवण्यात येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमसह कोलकत्याहून सुद्धा एक पथक रवाना होणार आहे. तर बिहारमधून एनडीआरएफच्या चार तुकड्या उद्या सकाळपर्यंत सिक्कीममध्ये दाखल होतील. या तुकडीत इंजीनिअर, पॅरा मेडिकल स्टाफ आणि बचाव दलासह डॉग स्क्वॅडसुद्धा आहे.

close