ईशान्य भारतात भूकंपाचे 42 बळी

September 19, 2011 8:58 AM0 commentsViews: 2

19 सप्टेंबर

ईशान्य भारताला रविवारी भूकंपाचा मोठा धक्का बसला. त्यात आतापर्यंत 42 जणांचा बळी गेला आहे. सिक्कीममध्ये सर्वात जास्त नुकसान झालं आहे. एकट्या सिक्कीमध्ये 35 जणांचा मृत्यू झाला. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. खराब हवामानामुळे बचावकार्य कठीण बनलंय. दरम्यान पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली.

संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटं झाली होती. अचानक 6.8 रिक्टरस्केलच्या मोठ्या भूकंपाने उत्तर-पूर्व भारत हादरुन गेला. गंगटोकपासून 54 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे झटके दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, ओरीसा आणि नेपाळाला बसले. जवळपास अर्धा देश या भूकंपाने हादरुन गेला. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सिक्कीमच्या आसपासच्या परिसरात तर भूकंपामुळे प्रचंड हानी झाली.

भूकंपाने सिक्कीमचा संपर्क तुटला. मोबाईलच्या नेटवर्कलाही त्याचा फटका बसला. भूकंपानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे महामार्ग बंद झाला. संपर्क तुटल्याने मदत कार्यात अडथळा येत होता. पण तरीही लष्कर कसोशीनं प्रयत्न सुरु आहेत.

केद्राने राष्ट्रीय आपत्ती निवारण टीम पाठली. एमआय-17 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून वैद्यकीय मदत पोहोचवली जातेय.

भूकंपामुळे सिक्कीम आणि उत्तर-पूर्व भारतात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. घरांची पडझड झाली. पण या सगळ्या भूकंपात नेमकं किती नुकसान झालंय हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण जस जसं हवामान सामान्य होईल तसंतसं चित्र स्पष्ट होईल.

हवाईदलाची मदत कार्याची विशेष मोहिम

भूकंपानंतर बचावकार्य सुरू झालं आहे. भारतीय हवाईदलाने पहिल्यांदाच मदत कार्याच्या विशेष मोहिमेसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण टीमला सूपर हरक्युलस हे विमान दिलं. हे विमान कच्च्या रनवेवरही उतरु शकतं. शिवाय अंधारातही ते उड्डाण करू शकतं. पण सध्या या ठिकाणी हवामान अत्यंत प्रतिकूल आहे. त्यामुळे मदत कार्यात मोठे अडथळे निर्माण होताहेत.

त्यामुळे जोपर्यंत हवामान ठीक होत नाही तोपर्यंत हेलिकॉप्टरर्स उड्डाण करू शकणार नाहीत, असं हवाई दलाने स्पष्ट केलं. आता लष्करानेच मदत कार्यात झोकून दिलं आहे. बिहारने 160 जणांचे पथक पाठवलं आहे. तर बीएसएफने मदत कार्यासाठी डॉग स्कॉड पाठवलं आहे. त्याचबरोबर इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांकडून 350 खेड्यातल्या भूकंपग्रस्तांसाठी विशेष कॅम्पच्या माध्यमातून मदत कार्य सुरू आहे. या कँम्पमध्ये जवळपास 2000 नागरीकांनी आश्रय घेतला आहे.

ईशान्य भारतासोबतच रविवारी नेपाळलाही भूकंपाचा धक्का बसला. त्यात सात जणांचा मृत्यू झाला. 1934 नंतर नेपाळला बसलेला हा भूकंपाचा मोठा धक्का आहे. 1934 च्या भूकंपात 15 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. कालच्या भूकंपामुळे काठमांडूतल्या ब्रिटीश दूतावासाचे कम्पाऊंड कोसळलं. त्यात 3 जणांचा बळी गेला. पण ब्रिटीश दूतावासाजवळच असलेल्या भारतीय दूतावासाचे मात्र कोणतंही नुकसान झालेलं नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूपासून 300 किलोमीटर अंतरावरच्या टेपलजंग जिल्ह्यात होता.

close