कर्मचार्‍यांचा संप बिनशर्त मागे

September 20, 2011 2:30 PM0 commentsViews: 5

20 सप्टेंबर

वेतनवाढीच्या मागणीसाठी पुकारलेला मुंबई महापालिका कर्मचार्‍यांचा संप अखेर शरद राव यांच्या कामगार संघटनेनं बिनशर्त मागे घेतला. संप मागे घेताना शरद राव यांची एकही मागणी मान्य झाली नाही. पण लोकांच्या दबावामुळे आणि सरकारने कठोर भूमिका घेतल्यामुळे शरद रावांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे दिवसभर त्रासाला सामोरं जावं लागलेल्या सामान्य मुंबईकरांची पुढच्या त्रासातून सुटका झाली. संपकरी कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं. मागण्यांबाबत सरकारबरोबर 23 सप्टेंबरला पुन्हा चर्चा होणार असल्याचे समजतं आहे.

सोमवार रात्रीपासून संपावर गेल्या कर्मचार्‍यांमुळे आज दिवसभर मुंबईकरांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. मुंबई महापालिकेतील 70 टक्के कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे मुंबईतल्या नागरी सेवांवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर कचरा तसाच साचला. तर महापालिकेच्या हॉस्पिटलमधील काही नर्सेस, वॉर्ड बॉय संपावर गेल्यामुळे मुंबईकरांना या संपाचा चांगलाच फटका बसला आहे. नव्या वेतनश्रेणीच्या मुदद्यावरुन कामगार नेते शरद राव यांच्या संघटनेनं संप पुकारला होता. त्याचा मुंबईतल्या पाणी विभाग, अग्निशमन दल, सफाई विभाग आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम जाणवला. शरद राव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार नेते असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले होते. सकाळपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. आद दुपारी चर्चेची तिसरी फेरी साडेतीन वाजता पार पडली आणि संप मागे घेणार असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागलं.

close