शाहिरांच्या वारसाला भीक मागण्याची वेळ !

September 21, 2011 2:28 PM0 commentsViews: 7

गणेश गायकवाड, उल्हासनगर

21 सप्टेंबर

ज्यांच्या पहाडी आवाजानं एक काळ दुमदुमला, ज्यांच्यामुळे उल्हासनगरला नवी ओळख मिळाली. त्याच उल्हासनगरमध्ये एका कलाकाराच्या मुलीच्या आयुष्याची परवड सुरू आहे.

70 ते 80 च्या दशकात लोकशाहीर विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे बरोबर फड रंगवणारे विश्वनाथ रुपवते एक जबरदस्त पहाडी आवाजाचे गायक होते. त्यांच्या निधनानंतर मात्र त्यांच्या मुलीच्या नशिबी दारिद्र्य आलं. आणि पोटासाठी तिला अक्षरश: भीक मागावी लागत आहे. विश्वनाथ रुपवते यांच्या मुलगी अनिता रुपवतेंना उल्हासनगर स्टेशनवर अक्षरश: भीक मागून आपलं पोट भरावं लागतं आहे.

10 वर्षांपूर्वी मुसळधार पावसात अनिताला एक रात्र उघड्यावर कुडकुडत काढावी लागली. त्यात न्युमोनिया झाला उपचारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तिला अपंगत्त्व आलं. शरीरानंही अशी साथ सोडल्यावर मग भीक मागण्याशिवाय पर्याय तरी काय होता. रेशनकार्डासाठीही अनिताकडे पैसे नव्हते त्यावेळी एका सामाजिक कार्यकर्तीनं मदत केली. 7 बाय 7 च्या या झोपडीत अनिता हलाखीचं जिणं जगतीये. एका कलावंताची पोर भीक मागून पोटाला खाऊ घालतीय. पण सांस्कृतिक श्रीमंतीचा टेंभा मिरवणार्‍या पुरोगामी महाराष्ट्र सरकारला अनिताकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

close