चिदंबरम यांची राजीनाम्याची तयारी

September 26, 2011 2:25 PM0 commentsViews: 2

26 सप्टेंबर

2 जी स्पेक्ट्रमच्या जाळ्यात आता पी चिदंबरम पुरते अडकलेत! आज त्यांनी सोनिया गांधींना भेटून राजीनामा देण्याची तयारी दाखवली. चिदंबरम यांना अडचणीत आणणार्‍या प्रणव मुखजीर्ंनी आज पुन्हा त्यांना पाठिंबा दिला असला. तरी त्यामुळे चिदंबरम यांच्या अडचणी कमी झाल्या नाही. एकीकडे आज ए राजांनी सीबीआय कोर्टात मागणी केली की चिदंबरम यांना कोर्टात हजर करण्यात यावं. तर दुसरीकडे उद्या सुप्रीम कोर्टात चिदंबरम यांच्याविरोधात सुब्रमण्यम स्वामींनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

ए राजा, कनिमोळी करुणानिधी, दयानिधी मारन आणि आता पी चिदंबरम! 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची धग द्रमुक पाठोपाठ अखेरीस काँग्रेसपर्यंत पोचली. चहूबाजूंनी अडचणीत सापडलेल्या चिदंबरम यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली.

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात आपला कोणताही सहभाग नव्हता असं स्पष्टीकरण दिलं. आणि पक्षाला नाचक्कीपासून वाचवण्यासाठी आपण राजीनामा द्यायला तयार आहोत असं सांगितलं. चिदंबरम यांच्यानंतर त्यांना अडचणीत आणणार्‍या प्रणव मुखजीर्ंनीही सोनिया गांधींची भेट घेतली. आणि आत जाण्यापूर्वी चिदंबरम यांची स्तुती करून नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान मनमोहन सिंग मंगळवारी रात्री भारतात परतणार आहेत. त्यांनतरच चिदंबरम यांच्या राजीनाम्याच्या ऑफरवर विचार केला जाईल. चिदंबरम यांनी त्यांचा मंगळवारचा ओडिसा दौरासुद्धा तेवढ्यासाठीच रद्द केला. दरम्यान, प्रणव मुखजीर्ंनी पंतप्रधानांना कळवलंय की ज्या पत्रामुळे हा वाद सुरू झाला, ते पत्र अर्थ मंत्रलयाकडून प्रसृत झालं नसून. पंतप्रधान कार्यालयातूनच बाहेर पडलं होतं. हे पत्र म्हणजे कुणाचे वैयक्तिक मत असू शकतं. त्याला फार महत्त्व देऊ नये अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकारकडून करण्यात येतोय.

दुसरीकडे विशेष सीबीआय कोर्टातही चिदंबरम यांच्याविरोधात ए राजांनी आपलं म्हणणं मांडलं. मी घेतलेल्या सर्व निर्णयांची चिदंबरमना माहिती होती. त्यांना सीआरपीसीच्या कलम 311 अंतर्गत साक्षीदार म्हणून कोर्टात हजर राहण्याचे आदेश द्या, अशी मागणी राजांनी केली.

ए राजा म्हणाले..

'2 जी स्पेक्ट्रमबाबतच्या सर्व निर्णयांत पी चिदंबरम सहभागी होते. मी त्यांना आरोपी म्हणत नाहीय, पण त्यांना सर्व ठाऊक होतं. म्हणून त्यांना कृपया कोर्टात बोलवा आणि विचारा. गरज पडल्यास पंतप्रानांनाही साक्षीदार म्हणून बोलवा.'

दरम्यान, स्वतः ए राजांसमोरच्या अडचणीही वाढल्या आहेत. कारण सीबीआने त्यांच्याविरोधात कलम 409 लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता त्यांना आणि इतर आरोपींना जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. पण आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या सुप्रीम कोर्टाकडे. कारण चिदंबरम यांची 2जी स्पेक्ट्रम प्रकरणी चौकशी करावी, या सुब्रमण्यम स्वामींच्या याचिकेवर मंगळवारी सर्व पक्षांचे म्हणणं कोर्ट ऐकून घेणार आहे. सलग चार तास चालणा-या या सुनावणीत चिदंबरम यांचं भविष्य अवलंबून असेल.

close