रहिवासी भागात ट्रान्सपोर्ट कंपनीमुळे नागरिक त्रस्त

September 26, 2011 2:57 PM0 commentsViews: 58

26 सप्टेंबर

रहिवासी भागात बांधलेल्या गोदामातून दिवस-रात्र होणार्‍या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुण्यातील पर्वती परिसरातील एल.आय.सी कॉलनी भागात राहणारे शेकडो नागरिक त्रस्त आहेत. या गोदामाचा मालक असलेले शांतीलाल रावळ यांनी सोसायट्यांच्या मालकीच्या ओपन स्पेसवर बेकायदेशीरपणे हे गोदाम बांधल्याचा तसेच महापालिकेची जकात चुकवून हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालू ठेवल्याचा इथल्या रहिवाशांचा आरोप आहे. रावळ हे गुंडांकरवी धमकावत असल्यांचं पोलिसात खोेट्या तक्रारी देत असल्याचही नागरिकांचे म्हणणं आहे तर शांतीलाल रावळ यांच्या वकिलांनी रावळ हे नियम पाळत कायदेशीरपणे व्यवसाय करत असल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

सिंडीकेट ट्रान्सपोर्ट या शांतीलाल रावळ यांच्या मालकीच्या गोदामातून अहोरात्र टॅक्स-टेंपोची वाहतूक सुरू असते. ज्या भागात हे गोदाम आहे त्याला लागून अनेक अपार्टमेंट्स- सोसायट्या आहेत. या सोसायट्यांच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशीरपणे हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय पालिकेची लाखो रूपयांची जकात चुकवून गेली अनेक वर्ष सुरू असल्याचा रहिवाश्यांचा दावा आहे.

सोसायटीच्या 30 फुटी रस्त्यावरून रात्री अपरात्री पहाटे कायम अवजड वाहतूक होत असल्याने या परिसरातील नागरिकांचं जीणं मुश्कील झालंय. रोजच्या कटकटीने त्रासलेल्या आणि महापालिका अधिकारी – विविध पक्षांचे नगरसेवक यांच्याकडे खेटे मारून वैतागलेल्या नागरिकांनी मी अण्णा हजारे या टोप्या घालत. शांततेनं भजनं म्हणत मोर्चा काढला आणि आपलं गार्‍हाणं मांडलं.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सरचिटणीस अशी पाटी शांतीलाल रावळ याने गोदामाबाहेर लावली. तसेच अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार निर्मुलन आंदोलनाचा कार्यकर्ता असल्याचे दाखवत अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या जाहिरातीही रावळ याने वृत्तपत्रात छापल्यात.

शांतीलाल रावळ यांच्याशी त्यांची बाजू जाणून घेण्याकरता फोनवर संपर्क साधला असता सुरवातीला त्यांनी चुकीचा नंबर असल्याचे सांगत बोलणं टाळलं पण तिथं उपस्थित रावळ यांचे वकील सच्छींद्र जाधव यांच्या मोबाईलवरून संपर्क साधला असता आपण सध्या बिहार येथील गया इथं असल्याचं त्यांनी सांगितलं.

रावळ यांचे वकील जाधव यांनी एक प्लॉट रावळ यांच्या मालकीचा असून लगतचा मोकळा प्लॉटही जमिनीच्या मूळ मालकासोबत डेव्हल्पमेंट ऍग्रीमेंट करून ताब्यात घेतल्याचा दावा करत पालिकेकडे टॅक्स भरून कायदेशीरपणे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय गेल्या 20 वर्षांपासून करत असल्याचं सांगत सध्या महापालिकेविरूध्द कोर्टातही लढाई चालल्याचं स्पष्ट करत रहिवाशांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत.

या भागाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी गेल्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून या मुद्द्याला वाचा फोडली पण महापालिका अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याने आपण आगामी अधिवेशनात हक्कभंग आणणार असल्याचे सांगितलं तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी रावळ याच्या व्यक्तीगत धंद्यांचा पक्षाशी संबंध नसल्याचे सांगत त्याच्या कारनाम्यांवर पालिकेनं कारवाई करावी असं सांगितलं.

लाखो रूपये खर्चून घरं घेतलेल्या नोकरी व्यवसाय करत असलेल्या या नागरिकांचे शांततेनं आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या एवडंच मागणं आहे. गेली अनेक वर्षं नागरिकांच्या या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करणारं महापालिका कोर्टात सुनावणी दरम्यानं गैरहजर राहणार वर 'जनहित ध्येयम' हे ब्रीदवाक्य मिरवणार पुणे महापालिकेचे प्रशासन आता तरी नागरिकांचं हित पाहणार आहे का ?

close