मिठागरांवर सरकारचा डोळा !

September 27, 2011 5:19 PM0 commentsViews: 2

27 सप्टेंबर

मुंबई आणि उपनगरातल्या मिठागराच्या जमिनी तसेच केंद्र सरकारच्या जमिनींवर खाजगी बिल्डरांचे मोठे प्रकल्प राबवण्याची राज्य सरकारची योजना आहे. त्यासाठी सुमारे पाच हजार एकर मिठागराची जमीन केंद्र सरकार मोकळी करेल असं दिसतंय. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच दिले आहेत. मुंबई आणि उपनगरात समुद्राच्या खाडीला लागून मोठ्या प्रमाणात मिठागराची जमीन आहे. याच जमिनीच्या जिवावर राज्य सरकारला मुंबईला झोपडपट्टीमुक्त करायचं आहे. त्यापैकी वडाळा ते मुलुंड आणि मालवणी ते दहिसर या पट्‌ट्यांमधल्या 13 ठिकाणच्या मिठागराच्या जमिनी केंद्र सरकारने मोकळ्या कराव्यात अशी मागणी राज्य सरकारने केलीय. त्यावर नियोजन आयोगाच्या मदतीने केंदीय मंत्रिगट लवकरच राज्य सरकारच्या बाजूने निर्णय घेणार असल्याचं समजतंय.

खरंच मिठागराच्या जमिनी केंद्र सरकारने मोकळ्या करून राज्य सरकारच्या हवाली केल्या तर मुंबई आणि उपनगरातली 2177 हेक्टर म्हणजे जवळपास पाच हजार एकर मिठागराची जमीन बांधकामासाठी उपलब्ध होणार आहे. मिठागराच्या जमिनीच्या बदल्यात केंद्र सरकारच्या जमिनीवरच्या झोपडपट्टीवासीयांचं पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं दिला.

म्हणजे मुंबई एअरपोर्ट (80,000 झोपड्या), मुंबई पोर्ट ट्रस्ट (15,000 झोपड्या) आणि रेल्वेच्या जागेवरच्या झोपड्यांचे पुनर्वसन मिठागराच्या केंद्र सरकारच्या हिश्श्याच्या जागेवर करण्यात येईल. तर मिठागराच्या राज्याच्या हिश्श्याच्या जागेवर राज्य सरकार आणि महापालिकेच्या जागेवरच्या झोपड्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. पण हे सर्व करताना बिल्डरांच्या फायद्याचाच विचार होत असल्याचा आरोप होतोय.

मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याच्या नावाखाली एसआरए आणि राजीव आवास योजनेच्या माध्यमातून मिठागराच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. पण त्याकडे पर्यावरणाच्या हानीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होतंय.मुंबई आणि उपनगरात मिठागराच्या जमिनी नेमक्या कुठे आहेत

वडाळा ते मुलुंड आणि मालवणी

त्यामध्ये वडाळा (164 हेक्टर), आणिक (54 हेक्टर), तुर्भे (148 हेक्टर), मंडाले (105 हेक्टर), चेंबूर (57 हेक्टर), घाटकोपर (56 हेक्टर), कांजूर मार्ग (598 हेक्टर), भांडुप (220 हेक्टर), नाहूर (86 हेक्टर), मुलुंड (456 हेक्टर), पहाडी (40 हेक्टर), मालवणी (18 हेक्टर) आणि दहिसर (175 हेक्टर) या ठिकाणच्या मिठागराच्या जमिनींचा समावेश आहे.

मिठागरांवर सरकारचा डोळा

- मुंबई शहर, उपनगरातली 2,177 हेक्टर (5 हजार एकर) मिठागराची जमीन मिळणार- मिठागराच्या जमिनीच्या बदल्यात केंद्राच्या जमिनीवरच्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव – मुंबई एअरपोर्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, रेल्वेच्या जागेवरच्या झोपड्यांचे पुनर्वसन मिठागराच्या केंद्राच्या जागेवर करणार

close