सीबीआय म्हणजे सरकारच्या हातातलं बाहुलं : भाजप

September 28, 2011 9:14 AM0 commentsViews: 2

28 सप्टेंबर

टू जी घोटाळ्यावरुन आता थेट पंतप्रधान विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे. सीबीआय केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करतंय, सीबीआय म्हणजे काँग्रेस बचाव इन्स्टिट्यूट आहे असा थेट आरोप करत भाजपने आज केंद्र सरकारवर केला. पंतप्रधानांनी भारतात परतत असताना थेट विमानानातूनच विरोधकांवर तोफ डागली होती. त्यानंतर भाजपने आज प्रत्युत्तर देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली.

भाजपच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि अरूण जेटली यांनी यामध्ये सरकार आणि पंतप्रधानांवर चांगलंच तोंडसुख घेतलं. आपल्या मंत्र्यांना वाचवण्यापेक्षा पंतप्रधानांनी सत्याची बाजू घेणं जास्त गरजेचं आहे असंही अरूण जेटली यांनी म्हटलं. टू जी ला सरकारचीही संमती होती हेच यातून सिद्ध होतंय. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं.

तसेच केंद्र सरकार अस्थिर करण्याएवढे खासदारच आमच्याकडे नसल्याने तसा कोणताही प्रयत्न आम्ही करत नसल्याचे जेटली यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान इतर सहकारी पक्षांच्या मंत्र्यांना वाचवत नाहीत. पण काँग्रेसच्या मंत्र्याने तीच चूक केली तर त्यांना मात्र वाचवतात असा आरोपही सुषमा स्वराज यांनी केला. तर वाढती महागाई, अनेक घोटाळे याला फक्त काँग्रेस नाही तर यूपीएतील सगळे घटक पक्षच जबाबदार असल्याचा आरोपही सुषमा स्वराज यांनी केला.

close