प्रणवदांच्या नोटवरून उठलेलं वादळ शमलं !

September 29, 2011 5:34 PM0 commentsViews: 2

29 सप्टेंबर

2 जी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नोटवरून सुरू झालेलं वादळ शांत करण्याचा प्रयत्न आज काँग्रेसने केला. प्रणव मुखर्जी आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी संध्याकाळी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि हे प्रकरण संपल्याचं जाहीर केलं. नोटमध्ये मांडलेले मुद्दे म्हणजे आपलं मत नाही. ही नोट अधिकार्‍यांकडून तयार करण्यात आली होती, असा दावा प्रणव मुखजीर्ंनी केला. मुखर्जी यांच्या स्पष्टीकरणामुळे आपलं समाधान झालं असल्याचं चिदंबरम यांनी स्पष्ट केलं. निवेदन केल्यानंतर पत्रकारांना प्रश्न विचारण्याची परवानगी मात्र त्यांनी दिली नाही.

आज पत्रकार परिषदेपूर्वी दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये बैठकींचं सत्र सुरू होतं. मुखर्जी आणि चिदंबरम यांनी आज पंतप्रधान मनममोहन सिंग यांची भेट घेतली. नोटवरून वाद सुरू झाल्यापासून त्यांची ही पहिलीच भेट होती. मुखर्जी आणि संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी सोनियांचे राजकीय सचिव अहमद पटेलही उपस्थित होते.

चिदंबरम यांचा कायदेशीर बचाव करायचा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनीही चिदंबरम यांची भेट घेतली. आणि पक्षात कोणतेच मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, 2 जी घोटाळा प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा सीबीआयने आज सुप्रीम कोर्टात पुन्हा बचाव केला.

राजकारणासाठी फायदेशीर असल्याने चिदंबरम यांच्यावर हल्ला करणं सोपं आहे असं सीबीआयनं सांगितलं. याप्रकरणाची पुढची सुनावणी आता 10 ऑक्टोबरला होणार आहे. स्पेक्ट्रमचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय एकटे चिदंबरम घेऊ शकत नव्हते. तो अधिकार केवळ मंत्रिमंडलाला होता. त्यामुळे चिदंबरम यांना दोष देणं चुकीचं असल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितले.

close