‘शिवसैनिकांनो कामाला लागा’ !

October 4, 2011 4:45 PM0 commentsViews: 23

विनोद तळेकर, मुंबई

04 ऑक्टोबर

येत्या गुरूवारी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी दसरा मेळाव्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर यंदाचा मेळावाही शिवसैनिकांसाठी महत्वाचा आहे.

"आम्ही नेहमीच कायद्याचा मान ठेवलाय. यंदाही न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करूनच हा मेळावा साजरा करू" उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्यानंतर काहीशा निश्चित झालेल्या उद्धव ठाकरेंची ही प्रतिक्रिया. कारण यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी खुपच महत्वाचा मानला जातोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब स्वत: या मेळाव्यासाठी उपस्थित राहाणार असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे.

चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुका पाहता बाळासाहेबांच्या भाषणात ' शिवसैनिकांनो कामाला लागा', असा आदेश असेलच, पण काही दिवसांपूर्वी रस्त्यांच्या कंत्राटावरून उद्धव आणि राज यांच्यात रंगलेल्या कलगीतुर्‍याचा उल्लेखही असेल. यावर बाळासाहेब आपल्या खास ठाकरी शैलीत काय बोलतात याकडे शिवसैनिकांबरोबर मनसेचंही लक्ष लागलेलं असेल. रामदास आठवलेंनी केलेल्या 62 जागांच्या मागणीसंदर्भातही त्यांना बाळासाहेबांकडून वडीलकीचा सल्ला दिला जाईल अशी शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत कलहा वरसुद्धा बाळासाहेब मार्मिक भाष्य करतील.

यंदाची महापालिका निवडणूक ही शिवसेना आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंसाठी अग्निपरिक्षा असेल. पन्नास टक्के महिला आरक्षण, आरपीआयला जागा देण्यासाठी करावी लागणारी तडजोड, त्यामुळे निर्माण होणारी पक्षांतर्गत नाराजी आणि मनसेचं आव्हान या सगळ्या आघाड्यांवर लढून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. त्यासाठी गरज असेल ती शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याची. आणि हे या मेळाव्यातून साधण्याचा प्रयत्न शिवसेना नेतृत्व करेल.

एक नेता…एक मैदान..आणि एक विचार… या न्यायाने गेली चार दशकं हा दसरा मेळावा पार पडतोय. आणि यंदाही तो उत्साहात पार पडण्यासाठी शिवसेनेचे मुंबईतले पदाधिकारी सज्ज झाले आहेत.

close