यंदाही पिवळ्या झेंडूला जास्त भाव

October 5, 2011 1:21 PM0 commentsViews: 226

05 ऑक्टोबर

दसरा म्हणजे विजयोत्सव. घराघराला तोरणं बांधून हा सण उत्साहात साजरा केला जातो. या काळात फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या फुल उत्पादक शेतकर्‍यांची लगबग सुरु झाली आहे. तर दसरा-दिवाळीच्या मार्केटसाठी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली जाते. पण यंदा नाशिकमधल्या झेंडू उत्पादक शेतकर्‍यांनी मुंबईऐवजी सुरतच्या मार्केटला पसंती दिली आहे. मुंबई मार्केटमध्ये 15 टक्के अडत कापली जात असल्याने तोटा होत असल्याचे शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. त्या तुलनेत सुरत मार्केटमध्ये मात्र भाव चांगला मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. शेंदरी झेंडूच्या तुलनेत पिवळ्या झेंडूला जास्त भाव असतो कारण त्याचं उत्पादन कमी होतं. यंदा शेतकर्‍याचा झेंडू 35 रुपये किलोने व्यापार्‍यांनी खरेदी केला. पुणे मुंबईच्या फुल बाजारातली दसर्‍याला फुलांची मोठी मागणी लक्षात घेऊन दरवर्षी प्रमाणे यंदा ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड परिसरात शेतकर्‍यांनी फुलांची शेती केली. कुसुरच्या सदाशिव ढोले यांनी एक एकरात ऍस्टरची लागवड केली. ऍस्टर बरोबर दसर्‍याला मागणी असते ती झेंडुच्या फुलांना. पिवळा आणि लाल झेंडूचं तोरण मंगलमयी मानलं जातं म्हणून या काळात झेंडूला सर्वात जास्त मागणी असते.

गुंजाळवाडी परिसराची खास ओळख असलेल्या निशिगंध म्हणजे गुलछडीच्या पांढर्‍या शुभ्र फुलांच्या माळांना सुद्धा दसर्‍याला मोठी मागणी असते. कमी खर्चात येणार्‍या आणि स्थिर भाव देणार्‍या फुल शेतीतून दसरा दिवाळीत शेतकर्‍यांना चांगले पैसे मिळण्याची आशा आहे.

close