रिक्षाचालकांना मनसे स्टाईल हिसका

October 5, 2011 6:39 PM0 commentsViews: 3

05 ऑक्टोबर

रिक्षाचालकांची मुजोरी खपवून घेणार नाही जर ही मुजोरी थांबली नाही तर मनसे आपल्या स्टाईलने उत्तर देईल असा इशारा काल राज ठाकरे यांनी दिल्यानंतर आज मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मनसेच्या वाहतूक सेनेनं त्यांच्या सभासद असणार्‍या 200 रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मिटर बसवण्याची मोहीम हाती घेतली. तसेच भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांना 'खळ्ळ', 'फटाक' भाषेत समजवण्यात आलं. दुसरीकडे शिवसेनेही या कारवाईत हात धुवून घेतले. मातोश्रीवर मोर्चा काढणार्‍या रिक्षाचालकांना शिवसैनिकांनी प्रसाद दिला. शरद रावांची दादगिरी मोडून काढू असा थेट इशारा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिला. शरद रावांची युनियन जर प्रवाशांना वेठीस धरत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. मातोश्रीवर मोर्चा काढण्याची भाषा कोणीही करू नये असंही राऊत यांनी ठणकावून सांगितले.

रिक्षाचालकांनी एकदिवसाचा संप पुकारल्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या 9 नोव्हेंबरला पुन्हा संपावर जाण्याचा इशारा कामगार नेते शरद राव यांनी दिला. रिक्षाचालकांच्या आंदोलनाचा समाचार घेत राज ठाकरे यांनी काल सज्जड दम भरला. रिक्षावाल्यांना मनसे स्टाईलनेचं उत्तर दिले जाईल असा इशारा राज यांनी दिला. आज मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील सायन,विक्रोळी,ठाणे या भागात रिक्षांची तोडफोड केली. तसेच विक्रोळी एलबीएस (LBS) रोडवर मनसेच्या वाहतूक सेनेनं त्यांच्या सभासद असणार्‍या 200 रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मिटर बसवण्याची मोहीम हाती घेतली. यामध्ये ई मिटर बसवणार्‍या रिक्षाचालकांना आपल्या रिक्षांवर जाहिरात करण्याची मूभाही आरटीओनं दिली असल्याची माहिती मनसे पदाधिकार्‍यांनी दिली.

तर सायन स्टेशनबाहेर गोंधळ घालणार्‍या 12 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे कार्यकर्ते मनसेचे असल्याचे सायन पोलिसांनी स्पष्ट केलं. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, तोडफोड करणे अशा कलमांखाली त्यांना अटक करण्यात आली. आज सकाळी सायन रेल्वे स्टेशन परिसरात 2 रिक्षांची तोडफोड करण्यात आली होती. तसेच रिक्षाचालकांच्या संपानंतर राज ठाकरे यांनी शरद राव यांना दिलेल्या इशार्‍यानंतर मुंबईत सर्वत्र मनसे कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावली आहे. या पोस्टर्सद्वारे उद्दाम रिक्षाचालकांना इशारा देण्यात आला. राज ठाकरे यांनी शरद राव यांना दिलेल्या आव्हानानंतर वांद्रे, घाटकोपर सारख्या काही भागात रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं.

close