‘लोकपाल’ च्या बैठकीचे ऑडिओ रेकॉर्डिंग होणार जाहीर

October 9, 2011 1:36 PM0 commentsViews: 5

09 ऑक्टोबर

लोकपाल विधेयकासाठीच्या संयुक्त मसुदा समितीच्या बैठकीचे रेकॉर्डिंग प्रसिद्ध करण्यास केंद्र सरकार अखेर तयार झालं आहे. खरं तर या मसुदा समितीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग प्रसिद्ध करावे अशी मागणी टीम अण्णांनी केली होती. पण त्याला नकार देत सरकारने फक्त ऑडिओ रेकॉर्डिंगचा काही भाग प्रसिद्ध करण्याची तयारी दाखवलीय. लोकपाल बिलाच्या मसुद्यासाठी होणार्‍या बैठकांमधील घडामोडी जनतेसमोर याव्यात या हेतूने नागरी समितीने ही मागणी केली होती. पण सरकारने त्याला आधी नकार दिला होता.

दरम्यान लोकपाल संदर्भातील संयुक्त मसुदा समितीच्या बैठकीचे ऑडिओ रेकॉर्डिंग जाहीर करण्याच्या सरकारच्या निर्णयांचे आरटीआय कार्यकर्ते एस सी अग्रवाल यांनी स्वागत केलं. या बैठकीत अनेक गोष्टी घडलेल्या असतील. मात्र दारामागे नेमकं काय घडलं हे आजपर्यंत कळू शकलेलं नव्हतं. आता या टेप्स बाहेर आल्यास अनेक गोष्टी समोर येणार आहेत.

दरम्यान, टीम अण्णांचे सहकारी संतोष हेगडे यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. सरकारनं मसुदा समितीच्या ऑडिओ रेकॉर्डिंगशी छेडछाड केली तर वाद निर्माण होऊ शकतो असा संशय हेगडे यांनी व्यक्त केला. सरकार अधिक पारदर्शी होऊ पहातेय, हे चांगलं आहे. फक्त एकच संशय आहे कि सरकारने या ऑडिओ रेकॉर्डिंग एडिट केल्या आणि स्वतःच्या सोयीचाच भाग प्रसिद्ध केला तर वाद निर्माण होऊ शकतो. सरकार ज्या पद्धतीनं टीम अण्णांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतेय त्यावरुन त्यांचा हेतू खूप चांगला आहे, असं वाटत नाही. – संतोष हेगडे

close