लोडशेडिंगविरोधात नागरिकांचा ‘महावितरण’वर हल्लाबोल

October 11, 2011 10:36 AM0 commentsViews: 12

11 ऑक्टोबर

राज्यभरात सणासुदीचे दिवसजवळ आले असताना सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.यवतमाळ,बुलढाणा, जळगाव, मुंबईत नालासोपारा येथे नागरिकांनी थेट महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. राज्यात सध्या साडे चार हजार मेगावॅटची तूट आहे. शहरी भागात सात तास तर ग्रामीण भागात 13 तासांपर्यंत भारनियमन सुरु आहे. उद्योगांना बुधवार पासून 16 तासांची आठवडी सुट्टी जाही करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी अघोषित लोडशेडिंगही सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे. ओरिसातली पूरस्थिती आणि तेलंगणा आंदोलनामुळे राज्याला मिळणार्‍या कोळशाचा पुरवठा सध्या बंद आहे. त्यावर लवकरच एक आढावा बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

मुंबईत नालासोपारामध्ये काल पुन्हा संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाची तोडफोड आणि जाळपोळ केली. नालासोपार्‍याच्या सेंट्रल पार्क परिसरात रास्तारोको करत त्यांनी अग्निशमन दलाची गाडीही फोडली. तर विजयनगरमध्ये महावितरणच्या ऑफिसची तोडफोड केली. दोन दिवसांपासून संतप्त नागरिकांचा महावितरण कार्यालयावरहा दुसरा हल्ला आहे. रविवारी रात्री सुद्धा नालासोपार्‍याच्या पुर्वेकडील अचोळे चंदन नाक्यावर असलेलं महावितरण कार्यालय नागरिकांनी जाळलं. त्यानंतर कालरात्री पण महावितरण कार्यायलाची नागरिकांनी तोडफोड केली.

बुलढाण्यात शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशारा

बुलढाण्यात लोडशेडिंगच्या विरोधात शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख ऍड हरिश रावळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच शेतकर्‍यांनी महावितरणच्या सब स्टेशनची तोडफोड केली. बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही तोडफोड करण्यात आली. गेले पाच सहा दिवसांपासून सुरु आसलेल्या लोडशेडिंगमुळे शेतीच्या पिकांचं नुकसान होतंय. त्यामुळे शेतकर्‍यांचा उद्रेक झाला. जर लोडशेडिंग असेच सुरु राहिले तर हे आक्रमक आंदोलन असेच सुरु राहील असा इशाराही या शेतकर्‍यांनी दिला.

यवतमाळमध्ये महावितरण कार्यालयाची तोडफोड

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी इथल्या महावितरणाच्या कार्यालयाची तोडफोड केली. यवतमाळ जिल्ह्यातल्या उत्तर वाढोणा या गावातल्या शेतकर्‍यांनी तब्बल चार तास रास्तारोको आंदोलन करुन सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागात 12 तास आणि शहरी भागात 6 तास लोडशेडिंग होतंय त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय.लोडशेडिंगमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होतंय. त्यांच्या हाताशी आलेलं पीक हातातून निघून जाण्याची वेळ आलीय.त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

जळगावमध्ये शिवसैनिकांडून तोडफोड

जळगाव जिल्ह्यात धरणगावमध्ये लोडशेडिंगविरोधात महावितरणच्या ऑफिसची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह 125 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. खाजगी वीज घेण्यास सरकाराचा सुस्त

दरम्यान, राज्यात वीजटंचाईबाबत गंभीर संकट असताना सरकार मात्र खाजगी प्रकल्पांमधुन जादा वीज घेण्यास उत्सुक नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रत्नागिरीच्या जिंदाल प्रकल्पामधुन सध्या राज्यसरकार 576 मेगावॅट वीज उचलतेय. राज्य सरकारकडून वीज खरेदीची हमी मिळाल्यास हा प्रकल्प किमान 1200 मेगावॅट वीज सरकारला देऊ शकतो मात्र राज्य सरकारने या प्रकल्पशी केवळ 300 मेगावॅट वीज खरेदीच्या सुरुवातीच्या करारानंतर कोणताही वाढ़ीव वीज खरेदीचा करार केलेला नाही. जिंदाल प्रकल्पाला कोळशाचीही कोणती समस्या सध्या नसल्याचं समजतंय.

close