लावणीपासून ढोलकीपर्यंत…सबकुछ महिलाच !

October 12, 2011 12:58 PM0 commentsViews: 12

रायचंद शिंदे, जुन्नर

12 ऑक्टोबर

तमाशा म्हणजे ठसकेबाज लावणी, घुंगरांचा नाद आणि ढोलकीची थाप…त्यामुळे तमाशाच्या फडात पुरूष कलावंतही असतातच. पण जुन्नरच्या अंजली नाशिककरांनी मात्र संपूर्ण महिलांचा असा तमाशाचा फड उभा केला आहे.

तमाशाच्या बारीत पायात चाळ बांधून पुरुषांच्या पुढं नाचणारी बाई असते. आणि ज्या ढोलकीच्या तालावर ती नाचते. त्या ढोलकीवरची थापही परुषांचीच असते. बाईविना तमाशा नसतो तसा पुरुषाविनाही तो असत नाही. ही तमाशाची पारंपरिक संकल्पना. पण आता तिला छेद देण्यात आला. अंजली नाशिककर यांनी फक्त महिलांचाच तमाशा उभा केला आहे.

हौसा कराडकर म्हणतात, हे वाद्य पुरुषाचं पण आम्ही कधी वाजवलं नाही. पण आता आम्हाला चान्स मिळाला आहे. या तमाशात गणगवळणीपासून वगनाट्यापर्यंत सगळं काही महिलाच सादर करतात. एवढंच नाही तर गणगवळणीतला श्रीकृषणही एक महिलाच साकारतेय. याचा त्यांना अपार अभिमान आहे. खरं तर तमाशानं समाज बिघडतो असं म्हणतात पण हा तमाशा समाज घडवायला निघाला आहेत. अंजली नाशिककर म्हणतात, आमचं मुख्य ध्येय म्हणजे स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात. यासाठी आम्ही प्रत्येक गावात जाऊन कार्यक्रम सादर करणार आहोत.

तमाशात पुरुषांची मक्तेदारी एवढी की बाईचा नाच पहायला बाईलाच बंदी …पण आता ही मक्तेदारी अंजली नाशिककरांनी मोडीत काढलीय. त्यामुळे आता घरातल्या बायकाही तमाशाला गर्दी करतील आणि झालंच तर पुरुषांनाच बंदी घालतील.

close