नागपूरची नाग नदी प्रदूषणाच्या विळख्यात

November 17, 2008 3:10 PM0 commentsViews: 101

17 नोव्हेंबर, नागपूर प्रशांत कोरटकर नागपुर शहरातलं नाग नदीचं पाणी एकेकाळी पिण्यासाठी वापरलं जायचं. पण आज या नदीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. अक्षरश : शहरातील घाण पाणी आणि कचरा टाकण्यासाठी या नदीचा वापर केला जात आहे. शहरातील पर्यावरणवाद्यांना नाग नदीमध्ये होत असलेल्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरणासंबधी संवेदनशील असलेल्या नागपुरातील उमेश चौबेंना नाग नदीत दिवसेंदिवस साचत चाललेल्या कचर्‍याबद्दल चिंता वाटत आहे. ' लोक या नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करत होते. पण आज या नदीला दुर्गंधीयुक्त नाल्याचं स्वरूप आलंय, याची खंत मला वाटतेय ', असं उमेश चौबे सांगत होते. 2002 मध्ये नागपूर शहराच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त नाग नदीची सफाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल होतं पण त्यानंतर काहीच झालं नाही. दुसरीकडे नदीच्या आसपास मोठ्या प्रमाणावर राहणारेही नदीत कचरा टाकतात. ' कचरा कुठे टाकायचा. जागाच नाही. दुसरा पर्यायाच नाही ', असं रमेश मोगरे यांनी सांगितलं. नागपुरातूनच उगम झालेली नाग नदी शहराच्या पूर्वेपासून पश्चिमेपयंर्त 25 किलोमीटर वाहते. या संपूर्ण परिसरात घाणीच साम्राज्य पसरलंय. शहराच्या विकासाच्या गप्पा मारणार्‍या नागपूर महानगरपालिकेला या घाणीमुळे शहराला धोका होऊ शकतो, याची आता जाणीव झाली आहे. ' नाग नदीचं पाणी शुद्ध करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा 10 ते 15 वर्षांत मोठा भीषण प्रश्न निर्माण होऊ शकतो', असं महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य अनिल सोले यांनी सांगितलं. नागपूर शहराची ओळख असलेल्या नाग नदीच्या स्वच्छतेसाठी पाऊल उचललं गेलं नाही, तर पुढच्या काळात शहर एखाद्या मोठ्या आजाराच्या विळख्यात सापडण्याचीही शक्यता आहे.

close