काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 55% मतदान

November 17, 2008 3:10 PM0 commentsViews: 6

17नोव्हेंबरकाश्मीरजम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झालं आहे. पहिल्या टप्प्यातल्या दहा जागांसाठी 102 उमेदवार रिंगणात आहेत. गुरेझ, बंदिपोरा, सोनावरी, नोबरा, लेह, कारगील, झांस्कर, सुरनकोट, मंधर, आणि पूँछ-हवेली या दहा जागांचा समावेश आहे. या दहा जागांसाठी एकूण 55 % मतदान झालं. खराब वातावरणामुळे काही भागातल्या मतदानावर परिणाम झाला. सर्वच फुटीरवादी पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली होती. हुरियत कॉन्फरन्सनं आज बंदिपोरामध्ये मोर्चार्चं आयोजन केलं होतं. त्यामुळे हुरियत कॉन्फरन्सच्या सर्व नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. अमरनाथ वनजमिनीच्या मुद्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीला जनेतेचा किती प्रतिसाद आहे, हे आता या मतदानावरून समजेल. निवडणुकांना सामोरे जाणा-या जवळपास सर्व पक्षांच्या जाहीरनाम्यात अमरनाथ जमीन प्रकरण, दहशतवाद समाप्त करून राजकीय स्थिरता आणणे, विकास, रोजगार, महिला सबलीकरण असे जवळपास सारखेच मुद्दे आहेत. तसंच स्वायत्तता हा मुद्याही काही प्रमुख पक्षांच्या अजेंड्यावर आहे. पहिल्या टप्प्यातला प्रचार थंडावला असून आजच्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. 10 जुलै 2008 पासून राजकीय अस्थिरतेच्या कारणामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान 87 मतदारसंघात एकूण सात टप्प्यात हे मतदान पार पडणार आहे. मतदान शांततेत पार पडावं यासाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल, तसंच मतदार आणि उमेदवार यांच्या सुरक्षेचीही पूर्ण खबरदारी घेण्यात येईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. तसंच निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष तर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल डेमोक्रॅटिक पार्टी हे दोन प्रादेशिक पक्ष यांच्यामध्ये प्रामुख्यानं लढत होईल.

close