अण्णा समर्थकांनाही जबर मारहाण

October 13, 2011 1:26 PM0 commentsViews: 5

13 ऑक्टोबर

टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांना बेदम मारहाण केल्यानंतर आज पुन्हा भगतसिंग क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी अण्णा समर्थकांना बेदम चोप दिला . भूषण यांना मारहाण करणार्‍या हल्लेखोरांना दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आले यावेळी कोर्टाबाहेर जमलेले अण्णांना समर्थकांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तीन अण्णा समर्थक जखमी झाले आहेत.

काल बुधवारी प्रशांत भूषण यांना त्यांच्या सुप्रीम कोर्टाच्या चेंबरमध्ये घुसून भगतसिंग सेनेच्या तीन कार्यकर्त्यांपैकी एकाने बेदम मारहाण केली होती. यावेळी हल्लेखोरांपैकी स्वत:ला श्रीराम सेनेचा अध्यक्ष म्हणवणारा इंदर वर्मा याला कालच अटक करण्यात आली. तर भगतसिंग क्रांती सेना असं संघटनेचं नाव सांगणारे तेजिंदरपाल सिंह बग्गा आणि विष्णू गुप्ता या दोघांना आज अटक करण्यात आली. या तीघांना आज पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

यावेळी कोर्टाबाहेर समर्थन करण्यासाठी भगतसिंग क्रांती सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. याचवेळी अण्णांचे समर्थकही आपला निषेध व्यक्त करण्यासाठी हजर होते. यावेळी सुनावणी होऊन हल्लेखोर बाहेर येत असताना सेनेच्या समर्थकांनी अण्णांच्या समर्थकांवर हल्ला चढवला. लाथा बुक्यांने मारहाण करण्यात आली. हे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाही तर अण्णांच्या समर्थकांचा पाठलाग करून चोप दिला. या मारहाणीत तीन अण्णा समर्थक गंभीर जखमी झाले आहेत. मात्र यावेळी हजर असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.

close