ऊसतोड कामगार, वाहतूकदारांना घसघशीत वेतनवाढ

October 15, 2011 3:49 PM0 commentsViews: 24

15 ऑक्टोबर

राज्यातील ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूकदार, मुकादम यांना शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे लवादाने घसघशीत वेतनवाढ देत दिवाळी भेट दिली. यावर्षीच्या गळीत हंगामापासून पुढील 3 वर्षापर्यंत करारानुसार ऊसतोडणी कामगारांना प्रति टन 190 रूपये 16 पैसे मिळतील. ही वाढ 70 टक्के आहे तर मुकादमांच्या कमीशनमधे 1 टक्क्याने वाढ करत कमीशन 17 टक्क्यावरून 18 टक्के करण्याचा निर्णय घेतला.

मुकादमांना आता प्रति टन 34 रूपये 22 पैसे मिळतील. पुण्यात साखर संकुलात ऊसतोडणी कामगार, वाहतुकदारांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्याकरता नेमण्यात आलेल्या पवार-मुंडे लवादाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर नियोजित संप संपल्याचही जाहीर करत आता सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या बैठकीत कामगारांकरता अपघात विमा योजना तसेच ऊसकामगारांच्या मुलांच्या शिक्षणाकरता साखर शाळांव्यतिरिक्त वेगळी योजना राबवण्यात येणार असल्याचही ठरलं. या बैठकीला शरद पवार, गोपीनाथ मुंडे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ तसेच ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.

close