टीम अण्णा जाणार मणिपूरला

October 16, 2011 11:42 AM0 commentsViews: 2

16 ऑक्टोबर

गेले 75 दिवस सदन हिल्स या नव्या जिल्ह्याच्या मागणीकरता मणिपूर धुमसतंय. मणिपूरमधील नागालँडमार्गे आसामकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 39 आणि म्यानमारकडे जाणारा महामार्ग क्रमांक 53 हे आंदोलनकार्‍यांनी ब्लॉक केले आहेत. दुसरीकडे लष्कराला देण्यात आलेल्या अमर्यादा अधिकारांच्या विरोधात शर्मिला इरोम ही कार्यकर्ती गेली 10 वर्ष उपोषण करतेय. मणिपूरमधील ही धुमसती परिस्थिती बदलण्याकरता आता अण्णा हजारे आणि सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार पुढे सरसावले आहेत.

वेगळ्या जिल्ह्याच्या मागणीसाठी मणिपूरमध्ये साडेतीन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचे भाव दुपटीपेक्षाही जास्त वाढले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आता पुण्यातल्या सरहद संस्थेनं पुढाकार घेतला आहे. संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी राळेगणसिध्दीला जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली. येत्या 24 ऑक्टोबरला अरविंद केजरीवाल आणि अखिल गोगई हे टीम अण्णाचे सदस्य मणिपूरला भेट देतील. तसेच संस्थेतर्फे पुण्यात चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन धारियासुद्धा उपस्थित होते. ते स्वत: याविषयी पंतप्रधान आणि सोनिया गांधींना पत्र लिहणार आहेत. तसेच येत्या 31 ऑक्टोबरला दिल्लीत होणार्‍या इंदिरा गांधी शांतता पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्विकारताना भाषणातही धारिया मणिपूरचा मुद्दा मांडणार आहेत.

close