जनतेचा कौल मान्य – अजित पवार

October 17, 2011 5:53 PM0 commentsViews: 10

17 ऑक्टोबर

पुण्यातील खडकवासला येथे झालेल्या पोटनिवडणुकीतला पराभव उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मान्य केला आहे. खुलेपणाने पराभव मान्य करतो.आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न केला. पण आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे. जे निवडून आले त्यांना आम्ही सहकार्य करू अशी प्रतिक्रिया अजितदादांनी आयबीएन लोकमतला दिली.

तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड म्हणाले की हा पराभव एकट्या अजित पवारांचा नाही तर हा पराभव पक्षाचा आहे या निवडणुकीत शिवशक्ती-भिमशक्ती युती वरचढ ठरली मात्र आघाडीचे कार्यकर्ते शेवटच्या माणसांपर्यंत पोहचले नाहीत अशी प्रतिक्रिया दिली. तर पराभव मान्य आहे, तरी आम्ही चांगली लढत दिली आणि या पराभवाची कारणं शोधावी लागतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

अजितदादांचा पराभव !

अजित पवारांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या खडकवासला पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. हा विजय शिवशक्ती-भीमशक्ती युतीचा असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला. तर मनसेसह सर्वच विरोधक एकत्र आल्याने आपला पराभव झाल्याचा दावा अजित पवार यांनी केला.

काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या हर्षदा वांजळे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीनं सगळी ताकद पणाला लावली. पण भीमराव तापकीर यांनी 3 हजार 625 मतांनी हर्षदा वांजळेंचा पराभव केला. आणि हा शिवशक्ती-भीमशक्ती युतीचा विजय असल्याचा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला.पण मनसेची मतं राष्ट्रवादीला न मिळाल्याचा फटका बसल्याचा दावा अजित पवारांनी केला.

या निवडणुकीत मित्रपक्षांमधील दुफळीही दिसून आली. एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या प्रचारात पाहिजे तेवढा रस घेतला नाही. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेतल्या मुंडे गटानंही तापकीर यांच्या प्रचारात रस दाखवला नाही. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्तीचा विजय म्हणून शिवसेना-भाजपने हुरळून जाण्याचे कारण नाही. तर राष्ट्रवादीनए या पराभवातून आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण येत्या महापालिका निवडणुकांसाठीची रणनीती सगळ्याच पक्षांना या निवडणुकीतल्या अनुभवांवरुन ठरवावी लागणार आहे.

close