युवासेनेच्या वर्धापनदिनात आयटम साँगची झिंग

October 18, 2011 9:29 AM0 commentsViews: 10

18 ऑक्टोबर

शिवसेनेची नवी अंगीकृत संघटना असलेल्या युवा सेनेचा पहिला वर्धापनदिन काल पार पडला. मात्र शिवसेनेच्या नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम वेगळा होता. यावेळी शिवसेनेची परंपरा मोडत, कार्यक्रमात पोवाड्यांऐवजी आयटम साँगचीच गर्दी होती. स्टेजवर शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटो, आणि त्यासमोर "शीला की जवानी", "मुन्नी बदनाम" आणि लावण्या सादर झाल्या. युवा सेनेच्या या कार्यक्रमावर विरोधकांनीहीटीका केली आहे. नुसते वर्धापन दिन साजरे करु नका तर दरवर्षी काही तरी प्रगती करा, युवासेनेत लढवय्ये जवान असले पाहिजेत असा संदेशयावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. बाळासाहेब ठाकरे यांचं रेकॉर्ड केलेलं भाषण यावेळी दाखवण्यात आलं.

गेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या एका नव्या संघटनेची घोषणा केली. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या प्रमुख मुद्दयांसह युवानेता अदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली युवासेनेने गेल्या वर्षभरात युवकांचे अनेक प्रश्न हाताळले. गेल्या वर्षी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी आठ जागा जिंकत युवासेनेने जबरदस्त यश मिळवलं आणि विरोधकांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावली. त्यानंतरही अण्णा हजारेंच्या आंदोलनादरम्यान त्यांची घेतलेली भेट असो, की गणपती विसर्जनानंतर चौपाट्यांवर घेतलेली स्वच्छता मोहीम असो, अशा अनेक उपक्रमाद्वारे युवासेना चर्चेत राहिली. मुंबई विद्यापीठाच्या हॉकी संघनिवडीत हस्तक्षेप करत युवासेनेने स्थानिक पात्र खेळाडूंची मदत केली. शिवसेनेच्या राडा संस्कृतीतून बाहेर पडत युवासेनेने आपली एक वेगळी कार्यपद्धती तयार केली. मात्र काल झालेल्या वर्धापनदिनात युवासेनेच्या स्टेजवरच "शीला की जवानी","मुन्नी बदनाम" आयटम साँगनेच युवासेनेची नवी ओळख दाखवली.

close