विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवात दर्जाहीन सांस्कृतिक कार्यक्रमांचं गालबोट

October 18, 2011 5:58 PM0 commentsViews: 5

18 ऑक्टोबर

महाराष्ट्र राज्य विधानमंडळाने 75 व्या वर्षात पदार्पण केलंय. त्यानमित्ताने अमृतमहोत्सवाचा दोन दिवसीय सोहळा मुंबईत सुरू आहे. आज पहिल्या दिवसाचा मुख्य कार्यक्रम झाला. वर्षभर चालणार्‍या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांचे उद्घाटनही आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झालं. राष्ट्रपतींबरोबरच महाराष्ट्रातल्या राजकारणातली सर्व दिग्गज मंडळी या मुख्य सोहळ्याला आज उपस्थित होती. या सोहळ्यात विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य असणारे गणपतराव देशमुख आणि विधानपरिषदेचे सदस्य राहिलेले बी. टी. देशमुख यांचा खास सत्कार करण्यात आला. तसेच विधिमंडळांचे टपाल पाकिटाचे प्रकाशन करण्यात आलं.

पण ढिसाळ नियोजन आणि सुमार दर्जाच्या सादरीकरणामुळे आजचा कार्यक्रम वादग्रस्त ठरला. कार्यक्रमाच्या मुख्य हॉलमध्ये निम्म्या खुर्च्या रिकाम्याच होत्या. स्टेजपासून दूर अंतरावर बसणार्‍या प्रेक्षकांना कार्यक्रम पाहता यावा, यासाठी एलसीडी बसवण्यात आले होते. पण अनेक एलसीडी बंदच होते. त्यामुळे कंटाळून अनेकजण उठून गेले. सरकारी कार्यक्रमांच्या रिवाजानुसार सुरवातीच्या खुर्च्यांमध्ये जुने-जाणते आजी-माजी सदस्य बसणं, अपेक्षित होते. पण, या सदस्यांना मागे बसवण्यात आलं होतं आणि सुरवातीच्या खुर्च्यांमध्ये उद्योजक-सिनेतारका बसल्या होत्या. याबद्दलही अनेकांनी आक्षेप घेतला. यावेळी सादर झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोककलांचे प्रतिबिंब कुठंही दिसलं नाही. आणि विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवानिमित्त झालेल्या भाषणांमध्येही विधिमंडळांच्या कामगिरीबद्दल अगदीच वरवरची चर्चा झाली, याबद्दलही अनेक सदस्यांनी नाव न जाहीर करता टीका केली.

close