राळेगणचे सरपंच आणि राहुल गांधींची भेट टळली

October 18, 2011 9:35 AM0 commentsViews: 11

18 ऑक्टोबर

राळेगणसिध्दीचे सरपंच आणि राहुल गांधी यांची भेट अखेर टळली. राळेगणचे सरपंच जयसिंग मापारी आणि त्यांचे सहकारी, आजच राळेगणला परतणार आहेत. राहुल गांधींनी राळेगणच्या सरपंचाला भेटायला नकार दिल्यामुळे, नाराज झालेले सरपंचांनी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्व कल्पना अण्णांना देण्यात आल्याचंही, अण्णांच्या सहकर्‍यांनी सांगितलं. तर गैरसमज झाल्यामुळे हा सगळा घोळं झाला असं स्पष्टिकरण थॉमस यांनी दिलं. दरम्यान, या सगळ्या घडामोडीची माहिती अण्णांना देण्यात आली. यानंतर अण्णांनी सगळ्यांना परत या, असं सांगितल्याचं सुरेश पठारेंनी सांगितलं आहे.

हिसारमध्ये काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झाल्यानंतर आज अण्णा हजारे आणि काँग्रेसमधील संबंध आणखी ताणले गेले. कारण राळेगणचे सरपंच राहुल गांधींना न भेटताच राळेगणला परतले. आम्हाला काँग्रेसनं फसवलं असा आरोप सरपंच जयसिंग मापारी यांनी केला. तर झाल्या प्रकारबद्दल मध्यस्थी करणारे काँग्रेस खासदार पीटी थॉमस यांनी सरपंचांची माफी मागितली.

हिसारच्या निवडणुकी काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट जात होतं. त्याच वेळेला.. शेजारच्या दिल्लीत.. ज्यांच्यामुळे काँग्रेसची ही नाचक्की झाली. त्या अण्णांचे सहकारी पोचले. आणि तेही काँग्रेसच्याच सरचिटणिसाची भेट घ्यायला. राळेगणचे सरपंच जयसिंगराव मापारी आणि त्यांचे सहकारी ग्रामविकासाच्या मॉडेलवर राहुल गांधींशी चर्चा करायला दिल्लीत आले. काँग्रेसचे केरळमधील खासदार पीटी थॉमस यांनी मध्यस्थी करून राळेगणकरांना बोलवलं होतं. पण भेटीच्या एक तास आधी थॉमस यांनी दावा केला की राहुल गांधींनी सरपंचांना बोलावलंच नव्हतं.

थॉमस म्हणतात, की त्यांनी राहुल भेटीचं आश्वासन दिलं होतं. पण अपॉइंटमेंट मिळवून दिली नव्हती. तर दुसरीकडे.. राळेगणचे सरपंच म्हणतात की त्यांना थॉमस आणि गांधी या दोघांच्या कार्यालयातून सकाळी 9ची वेळ निश्चितपणे मिळाली होती. ऐनवेळी भेट नाकारल्यामुळे अण्णांचे हे सहकारी अस्वस्थ झाले. त्यांनी अण्णांना राळेगणमध्ये फोन करून घटनेची माहिती पुरवली. अण्णांनी त्यांना ताबडतोब माघारी यावे असा संदेश दिला. पण आपली फसगत झाली, म्हणून ते नाराज होते.

अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी आम्हाला जाणीवपूर्वक फसवलं, यात राजकारण आहे असा आरोप केला.

ज्या काँग्रेसच्या खासदार महोदयांनी हा राळेगण ते तुघलक लेनपर्यंत सेतू बांधण्याचा घाट घातला. त्यांना झाल्या प्रकरणी सपशेल माफी मागावी लागली. पण काँग्रेसचे सर्व नेते थॉमस यांच्याएवढे उदार नाहीत. सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींच्या वागण्याचं समर्थन केलं. आणि त्यांनी भेट नाकारली. तर ती योग्य कारणामुळेच नाकारली असेल असं म्हणून अण्णांच्या जखमेवर मीठ चोळलं. अण्णा आणि काँग्रेस पक्षातली दरी भरून निघावी, म्हणून जो प्रयत्न केला जात होता. तो आता पुरता फसलाय. किंबहुना तो फसल्यामुळे आता ती दरी अधिकच रुंदावली.

close