आगामी निवडणुकांत आपल्या सोसायटीतच मतदान केंद्र !

October 20, 2011 6:02 PM0 commentsViews: 3

20 ऑक्टोबर

आगामी नगर पालिका आणि महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्र म्हणून खाजगी जागांचाही वापर केला जाणार आहे. यासाठी सोसायट्यांमधल्या निवासी संकुलांचा वापर केला जाईल अशी माहीती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी पुण्यात दिली. यामुळे वृध्द लोक, गरोदर स्त्रिया, अपंग मतदारांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारीही वाढू शकते. तसेच सध्याच्या निवडणूक आयोगाच्या अधिकारानुसार गुन्हेगारी पार्श्व भूमी असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यापासून रोखता येण्याची परिस्थिती नाही याची कबुलीही निवडणूक आयुक्तांनी दिली. तथापी उमेदवारी अर्जावेळी भरण्यात येणार्‍या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांवर असलेल्या गुन्ह्यांची माहीती भरणे बंधनकारक आहे. या शिवाय उमेदवारांवर गुन्हे दाखल झाल्याच्या बातम्या नगरपालिका तसेच महापालिकेच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार असल्याची माहितीही नीला सत्यनारायण यांनी दिली. पुणे महापालिकेची प्रभागरचना तसेच आरक्षणासंबंधी असलेल्या हरकतींच्या सुनावणीनंतर पत्रकारपरिषदेत नीला सत्यानारायण बोलत होत्या. येत्या फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेची निवडणूक होत आहे. नेमक्या तारखा तसेच आचारसंहिता कधी लागू होणार हे मात्र जाहीर करण्यात आलं नाही.

close