पदाधिकारी तुपाशी, खेळाडू उपाशी !

October 21, 2011 5:36 PM0 commentsViews: 5

विनायक गायकवाड, मुंबई

21 ऑक्टोबर

महाराष्ट्राच्या मातीतल्या कुस्तीची सध्या वाताहात झाली आहे. रोह्यात गेल्यावर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील घोळ सध्या समोर येत आहे. या स्पर्धेत समाधान घोडकेनं बाजी मारली. पण आता वर्ष उलटून गेलंय तरी त्याला बक्षिसाची रक्कम मात्र मिळाली नाही. तर या उलट कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकार्‍यांना मात्र रोख रक्कम देऊन भत्ते दिले गेले आहेत. आणि यामुळेच सध्या कुस्तीप्रेमी आणि संघटकही वैतागले आहेत.

रोह्यात झालेल्या 54 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची फायनल. चुरशीच्या झालेल्या या फायनलमध्ये समाधान घोडकेनं नंदू आबदारचा पराभव करीत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. स्पर्धेचे आयोजक जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंच्या हस्ते विजेत्याला मिळणारी चांदीची गदा आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरवही करण्यात आला. गदा मिळाली, प्रमाणपत्रही मिळालं, पण घोषित झालेली एक लाख रुपयांची रोख रकम त्याला अद्यापही मिळालेली नाही.

बक्षिसाचे हे पैसे कुठे गडप झाले याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुरुवात केली आयोजकांपासून पण कुस्तिगीर संघटनेकडून कुणीही यावर बोलायला तयार नाही. पण आयबीएन लोकमतच्या हाती यासंदर्भातील कागदपत्र हाती आली. एकीकडे विजेत्याला पैसे देण्यासाठी टाळाटाळ करणारी कुस्तीगीर परिषद दुसरीकडे मात्र त्याच स्पर्धेत पदाधिकार्‍यांना मात्र हजारो रुपयांचे रोख भत्ते देत होती. अगदी सात हजारांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंत भत्ते दिले गेलेत. विजेत्याला द्यायला जर पैसे नसतील तर मग पैशांची ही उधळण कशाला असा संतप्त सवाल आता कुस्तीपटूंकडूनच विचारला जातोय.

खेळाडूंना उपाशी ठेवून खेळाचा विकास कसा साधणार… हा प्रश्न समाधानला मिळायला हव्या असणार्‍या लाखाच्या बक्षिसाइतकाच लाखमोलाचा आहे.

close