पुण्यात धनकवडीमध्ये गुंडाचा हैदोस

October 22, 2011 10:06 AM0 commentsViews: 9

22 ऑक्टोबर

पुण्यातील धनकवडी भागात शुक्रवारी रात्री एका सशस्त्र टोळक्याने सामान्य नागरिकांच्या 50 हून अधिक वाहनांची तोडफोड करत हैदोस घातला. नवरात्र महोत्सवातील तोरण मिरवणुकीमध्ये झालेल्या प्रमोद निघवणे आणि दत्ता माने या दोन गटातील वादातून ही घटना घडल्याचं बोललं जातंय.या वादामुळे प्रमोद निघवणे याचा काल खून झाला. धनकवडीत या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण असून अद्यापी कुणालाही अटक झालेली नाही. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या धार्मिक मिरवणुकींना परवानगी देण्यासंदर्भात पोलिसांना सुचना करणार असल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी सांगितलं. ते मुबईत बोलत होते.

धनकवडी परिसरातल्या बालाजीनगरमधे शुक्रवारी रात्री 11 नंतर 20 ते 25 जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला. हातात धारधार शस्त्रं घेत जवळपास 52 वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. निघवणे गट आणि दत्ता माने गट यांच्यात नवरात्र उत्सवातल्या तोरण मिरवणुकीवरून वाद झाला होता. त्यातूनच प्रमोद निघवणेचा खून झाल्यानंतर ही घटना घडली.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळी परिसराला भेट दिली. येत्या 15 दिवसात नागरिकांच्या मागणीनुसार या भागात पोलीस चौकी सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. काही दिवसांपुर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये तोरण मिरवणुकीतल्या वादातूनच राष्ट्रवादीच्या तुषार ढोरेचा खून झाला होता. अशा मिरवणुकांवर कडक कारवाईचे आश्वासन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिले. पण तोरण मिरवणुका बंद करणं योग्य होणार नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

अशा मिरवणुकांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढलीय. तर नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे राजकीय पक्षांनीच एकत्र धार्मिक कार्याला हिंसाचाराचे गालबोट लागू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे.

close