कनिमोळींची दिवाळी तुरुंगातच !

October 24, 2011 11:15 AM0 commentsViews: 2

24 ऑक्टोबर

द्रमकचे अध्यक्ष करुणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांना यावर्षीची दिवाळी तुरुंगातच घालवावी लागणार आहे. स्पेशल सीबीआय कोर्टाने त्यांच्या जामिनावरचा निर्णय 3 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. या प्रकरणातल्या इतर पाच आरोपींच्या जामिनावरसुद्धा त्याच दिवशी निर्णय देण्यात येईल.सहा महिने तुरुंगात घालवल्यावर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना सोमवारी जामीन मिळेल, अशी आशा होती. 2जी प्रकरणी कोर्टाने आरोप निश्चित केले, कनिमोळींचे वडील आणि द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधीसुद्धा दिल्लीत होते. त्यामुळे आशा आणखीच वाढल्या होत्या. पण स्पेशल सीबीआय कोर्टाचे जज ओ. पी. सैनी यांनी जामीनावरचा निर्णय 3 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला.

कनिमोळी यांची तुरुंगातली वागणूक आणि कनिमोळींच्या लहान मुलाची देखभाल हे मुद्दे लक्षात घेता कोर्टानं कनिमोळींना जामीन द्यावा असा युक्तीवाद कनिमोळींच्या वकीलांनी केला. जामीन सशर्तही चालेल, असंही त्यांनी म्हंटलं. सीबीआयनंसुद्धा कनिमोळीच्या जामिनावर आक्षेप नसल्याचं म्हटलं. कनिमोळी, शरद कुमार आणि इतर 5 जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. जामिनावर कसलाच आक्षेप नाही कारण सर्वांविरोधात आरोप निश्चित करण्यात आलेत. पण जामिनावर कोर्ट काही दिवसांनंतर निर्णय देतील. ही रुटीन प्रोसिजर आहे. जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवल्यामुळे निराशा होणं साहजिकच होतं. द्रमुकचे नेते टी. आर. बालू आणि शाहीद बलवा यांच्याजवळ कनिमोळी यांनी ही निराशा बोलूनही दाखवली.

आम्हाला जे करता आलं ते आम्ही केलं, याशिवाय आम्ही काय करायचं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. द्रमुकने सध्यातरी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय. पण करुणानिधी यांचं संपूर्ण लक्ष कनिमोळी यांना जामीन कसा मिळेल, याकडेच असल्याचं सूत्रांकडून समजतं. सरकारमध्ये द्रमुकच्या दोन जागा आहेत. पण सध्यातरी त्या भरण्याचा पक्षाचा विचार नाही, सध्या 2जी प्रकरणी कायदेशीर आणि राजकीय लढा कसा देता येईल यावरच पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

close